भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-0 मालिकेला 13 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. मात्र, त्याआधी महत्वाची अपडेट समोर आली आहे.
या मालिकेसाठी भारतीय संघाला त्यांची नेहमीची ड्रेसिंग रूम वापरता येणार नाही. भारतीय संघ दुसऱ्या ड्रेसिंग रूमचा वापर करणार आहे. तसेच, सामने भारतात खेळवले जाणार असले तरी या मालिकेचे यजमानपद अफगाणिस्तानकडे आहे. त्यामुळे दिल्लीत भारतीय संघ पाहुणा संघ म्हणून, तर अफगाणिस्तानचा संघ यजमान संघ म्हणून खेळणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, घरच्या आणि पाहुण्या संघासाठी असलेल्या नियमानुसार अफगाणिस्तानचा संघ घरच्या संघासाठी असलेल्या ड्रेसिंग रूमचा वापर करेल. ही ड्रेसिंग रूम माजी भारतीय क्रिकेटपटू रमन लांबा यांच्या नावावर आहे. भारतीय संघ पाहुण्या संघासाठी असलेल्या ड्रेसिंग रूममध्ये राहणार असून, ही ड्रेसिंग रूम माजी भारतीय क्रिकेटपटू प्रकाश भंडारी यांच्या नावावर आहे.
ड्रेसिंग रूममध्ये होणाऱ्या या बदलाबाबत दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने सांगितले की, भारतीय खेळाडू प्रकाश भंडारी यांच्या नावाने असलेल्या पाहुण्या संघाच्या ड्रेसिंग रूममधून मैदानात येताना दिसणे हे एक वेगळे दृश्य असेल.
अफगाणिस्तानचा संघ भारतातील मैदानावर यजमान संघ म्हणून खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अफगाणिस्तानने ग्रेटर नोएडा, देहरादून आणि लखनऊ येथे आपले सामने खेळले आहेत. मात्र, भारताच्या भूमीवर अफगाणिस्तान भारतीय संघाविरुद्ध यजमान म्हणून खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे संबंध चांगले आहेत. भारतीय क्रिकेट बोर्डाने अनेकदा अफगाणिस्तानला मदत केली आहे.
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, यश ठाकूर.






