भारतीय महिला तिरंदाज दीपिका कुमारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचण्यापासून चुकली. दीपिकाचा महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या नाम सुह्यॉनविरुद्ध 4-6 असा पराभव झाला. या पराभवासह भारतीय तिरंदाजांचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. तत्पूर्वी, युवा भजन कौरला प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. यासह भारताची ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी पदकासाठीची 36 वर्षांची प्रतीक्षा कायम आहे.
भारताच्या 23व्या मानांकित दीपिकानं सध्याची सुवर्णपदक विजेती सुह्यॉनविरुद्धच्या 4-2 अशी आघाडी घेतली होती. पण शेवटी तिचा 4-6 (28-26, 25-28, 29-28, 27-29, 27-29 ) असा पराभव झाला. सुह्यॉननं शेवटचे दोन सेट सलग जिंकले. कोरियन तिरंदाजानं चार वेळा 10 गुण आणि दोनदा नऊ गुण मिळवून दोन्ही सेट आणि सामना जिंकला. तत्पूर्वी, दीपिकानं प्री-क्वार्टर फायनलमध्ये जर्मनीच्या सातव्या मानांकित मिशेल क्रॉपेनचा 6-4 (27-24, 27-27, 26-25, 27-27) असा पराभव केला होता.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दीपिकानं सुह्योनविरुद्ध शानदार सुरुवात करत पहिला सेट जिंकला. मात्र कोरियाच्या खेळाडूनं दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन केलं. तिनं दुसरा सेट जिंकून सामना 2-2 असा बरोबरीत आणला. दीपिकानं तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा चांगली सुरुवात करत आघाडी घेतली. दीपिकानं हा सेट जिंकत सामन्यात 4-2 अशी आघाडी घेतली. यानंतर चौथ्या सेटमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली, ज्यामध्ये सुह्यॉननं मागे राहिल्यानंतर दमदार पुनरागमन केलं. तिनं चौथा आणि त्यानंतर पाचवा सेट जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली.
या पराभवासह दीपिका इतिहास रचण्यात चुकली. दीपिकानं हा सामना जिंकला असता तर ती महिला एकेरीच्या तिरंदाजीच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली असती.
हेही वाचा –
भर ऑलिम्पिकमध्ये प्रेम व्यक्त, सुवर्णपदक विजेतीला सर्वांसमोर केलं प्रपोज; सुंदर VIDEO व्हायरल
चक दे इंडिया! तब्बल 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया भारताकडून चारीमुंड्या चीत
आर अश्विनचा फलंदाजीत कहर! सलामीला येऊन अवघ्या 30 चेंडूत फिरवला सामना