मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएल मधील मुंबई इंडियन्स संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. त्याची कामगिरी मागील काही महिन्यांपासून चांगली राहिली आहे.
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये स्पिरिट ऑफ क्रिकेट चॅलेंज स्पर्धेत अर्जुनने ब्रॅडमन ओव्हल ग्राउंडवर क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून खेळताना अष्टपैलू कामगिरी केली होती होती. त्याने हाँग काँग क्रिकेट क्लबविरुद्ध २७ चेंडूत ४८ धावा आणि ४ बळीही घेतले होते.
त्याचबरोबर अर्जुन देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघाकडून वेगवेगळ्या वयोगटात खेळला आहे. त्याने मागील महिन्यात १९ वर्षांखालील कूच बिहार ट्रॉफीत मुंबई संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत मध्यप्रदेश आणि रेल्वेविरुद्ध एका डावात ५ बळी घेण्याचीही कामगिरी केली होती.
मुंबई इंडियन्सकडून याआधी सचिन तेंडुलकर ७८ सामने खेळाला आहे. यात त्याने २३३४ धावा केल्या आहेत. सध्या सचिन मुंबई इंडियन्स संघामध्ये मेंटॉर म्हणून काम पाहतो.
याबद्दल अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही परंतु आयपीएल लिलाव पुढच्याच आठवड्यात होत आहे त्यात याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे.
अर्जुन बऱ्याचदा भारतीय संघाच्या सराव सत्रातही दिसला आहे. काही महिन्यांपूर्वी वानखेडे स्टेडिअमवर अर्जुन नेटमध्ये विराटला गोलंदाजी करताना दिसला होता.
अर्जुन २४ डिसेंबर १९९९ साली जन्मला असून तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तसेच तो डाव्या हाताने फलंदाजी करतो. तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे.
स्पिरिट ऑफ क्रिकेट चॅलेंज स्पर्धेत हाँग काँग क्रिकेट क्लबविरुद्ध केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर abc.net.au शी बोलताना अर्जुन म्हणाला होता, “मी जसा मोठा होत आहे तास मी उंच आणि चांगला गोलंदाज बनत आहे. मला बालपणापासून गोलंदाजी करायला आवडते. मला वेगवान गोलंदाज बनायला आवडेल कारण भारतात खूप कमी वेगवान गोलंदाज आहेत. ”