इंडियन प्रीमियर लीग २०२१ ची तयारी जोर धरत असून लवकरच या हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात सहभागी होणाऱ्या २९२ क्रिकेटपटूंच्या नावाची यादीदेखील जाहीर झाली आहे. त्यामुळे आयपीएल प्रेमींसह क्रिकेटपटूंनाही या लिलावाची उत्सुकता लागली आहे. तत्पुर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
रविवारी (१४ फेब्रुवारी) पोलिस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील गट ‘अ’च्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात त्याने आपल्यातील अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली. त्याच्या कामगिरीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबने इस्लाम जिमखानावर १९४ धावांनी मात केली.
एकाच षटकात मारले ५ षटकार
ही क्रिकेट स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) तर्फे आयोजित करण्यात आली आहे. तसेच कोविड-१९ मुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर शहरात आयोजण्यात आलेली पहिली क्रिकेट स्पर्धाही ठरली आहे.
या स्पर्धेतील एमआयजी क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्त्व करताना २१ वर्षीय अर्जुनने फिरकीपटू हाशिफ दाफेदारच्या एकाच षटकात ५ शानदार षटकार मारले. तर पूर्ण सामन्यादरम्यान अवघ्या ३१ चेंडूत ८ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ७७ धावा चोपल्या. सोबतच ४१ धावा देत ३ विकेट्सही काढल्या.
एमआयजी क्रिकेट क्लबचा दणदणीत विजय
प्रथम फलंदाजी करताना एमआयजी संघाने ४५ षटकात ७ विकेट्स गमावत ३८५ धावांचा डोंगर उभारला. यात अर्जुनव्यतिरिक्त सलामीवीर केविन डीएलमेडा (९६ धावा) आणि मधल्या फळीतील फलंदाज प्रगनेश खांडिलेवार (११२ धावा) यांनीही मोलाचे योगदान दिले. प्रत्युत्तरात इस्लाम जिमखाना संघ ४१.५ षटकात अवघ्या १९१ धावा करू शकला. यादरम्यान गोलंदाजी करताना अर्जुनशिवाय अंकुश जयस्वाल (३१ धावा देत ३ विकेट्स) आणि श्रेयस गुरव (३४ धावा देत ३ विकेट्स) यांनीही कमालीची गोलंदाजी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
चालू सामन्यात रोहित शर्माने रिषभ पंतच्या डोक्यात मारली टपली, पाहा गमतीशीर व्हिडिओ