ऑक्टोबरमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. यासाठी सर्व संघाची तयारी देखील चालू झाली आहे. मात्र अशातच ऑस्ट्रेलिया संघासाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच दुखापतग्रस्त आहे. फिंचला गुडघ्याला दुखापत झाली आहे. गुडघ्याच्या दोन हाडांच्यामधील भागात ज्याला कार्टिलेज म्हणतात. खेळाडूंना नेहमीच कार्टिलेजशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. सध्या फिंच देखील याच समस्यांनी ग्रासलेला आहे.
फिंचच्या गुडघ्याचा कार्टिलेज थोडासा तुटलेला आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असताना फिंचला ही दुखापत झाली होती. याबाबत आता एक बातमी समोर येत आहे. फिंचला या दुखापतीमुळे काही काळ क्रिकेटपासून लांब राहावे लागू शकते. विंडीज दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतलेल्या फिंचला काही काळ विलगीकरणात राहावे लागले. यानंतर गुरुवारी (१२ ऑगस्ट) त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
फिंचने शस्त्रक्रिया होण्यापूर्वीच याबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतर शस्त्रक्रिया झाल्यावर व्यवस्थित शस्त्रक्रिया पार पडल्याची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील माहिती दिली. ज्यामध्ये फिंचला अडीच महिन्यांचा आराम करण्यास सांगितले आहे. हीच बाब ऑस्ट्रेलियासाठी अडचणीची ठरत आहे. कारण, आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा १७ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. फिंचला अडीच महिन्याच्या विश्रांतीची गरज आहे. अशात फिंचला टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळायचे झाल्यास त्याला लवकरात लवकर तंदुरुस्त व्हावे लागेल.
दरम्यान, वेस्टइंडीजबरोबरच्या टी-२० मालिकेतील एका सामन्यात, फिंचला ही दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने संघातून आपले नाव मागे घेतले होते. ऑस्ट्रेलियाला संघाला टी-२० मालिका देखील गमवावी लागली. नंतर पुढील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीकडे कर्णधारपद सोपविण्यात आले होते.
याबाबत बोलताना फिंच म्हणाला, “मला गुडघ्याला कोणती दुखापत नव्हती, परंतु सरावादरम्यान माझ्या गुडघ्याला थोडीशी दुखापत झाली. ज्यानंतर सराव करताना गुडघ्यामध्ये त्रास होऊ लागला आणि हे सतत होऊ लागले. त्यामुळे स्कॅन करून पाहिले, तेव्हा समजले की, माझ्या गुडघ्यातील कार्टिलेज तुटली आहे. हे सर्व वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान झाले.”
दरम्यान, फिंचला टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळायची झाल्यास, त्याला काहीही करून स्पर्धेआधी बरे होऊन सरावाला सुरुवात करावी लागेल. ऑस्ट्रेलिया टी-२० विश्वचषकात ‘अ’ गटात सामील आहे. ज्यामध्ये वेस्टइंडीज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ आहेत. तसेच पात्रता फेरीतून आणखी दोन संघ गटात सामील होतील.
महत्वाच्या बातम्या –
–“महान खेळाडूची हीच ओळख असते, जेव्हा तो फॉर्ममध्ये नसतो तेव्हा तो…”, माजी क्रिकेटरचा विराटला पाठिंबा
–भारताच्या ‘या’ दोन महिला क्रिकेटपटूंची ‘द हंड्रेड’मधून माघार; ‘हे’ दिले कारण
–टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि ट्रेनर बदलणार, बायो-बबलमध्ये झाले नाहीत सहभागी