भारतीय क्रिकेट संघ (indian Cricket team) एजबेस्टनमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सराव करत आहे. इथे भारत आणि इंग्लंड यांच्यात 2 जुलैपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep singh) , आकाश दीप (Akash Deep) आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्कल एकमेकांशी मजेत भांडत होते. ते प्रशिक्षकाला चक्क खाली पाडत होते. आता अर्शदीपने स्वतः सांगितलं की ते असं का करत होते.
सोमवारी बीसीसीआयने (BCCI) एक व्हिडिओ शेअर आहे. त्यात अर्शदीपने सांगितले की, मॉर्न मॉर्कल म्हणाले होते जेव्हा तुझं सत्र संपेल, तेव्हा शेवटी मी तुला खाली पाडणार आणि त्यानंतर अजिबात प्रॅक्टिस नाही. म्हणजे दिवस संपल्याचं अशी वेगळीच खूण करून दाखवायची. आज आम्ही तेच करून दाखवत होतो.
अर्शदीपने भारतासाठी वनडे आणि टी-20 सामने खेळले आहेत, पण अजून कसोटीत पदार्पण केलेलं नाही. त्याने 21 फर्स्ट क्लास सामन्यांत 66 विकेट्स घेतल्या आहेत आणि दोनदा 5 विकेटही घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती दिली जाऊ शकते, त्यामुळे अर्शदीपला एजबेस्टनमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते. या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते.
एजबेस्टन स्टेडियममध्ये आतापर्यंत भारताने 8 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात इंग्लंडने 7 सामने जिंकले आहेत, एक सामना अनिर्णीत राहिला होता. आजपर्यंत भारताला या मैदानावर एकदाही कसोटी जिंकता आलेला नाही. सध्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 0-1 ने पिछाडीवर आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडने 5 विकेट्सने जिंकला होता. त्या सामन्यात भारताची गोलंदाजी आणि फिल्डिंग फारच खराब झाली होती.






