मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सोमवारी (१२ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये आयपीएल २०२१ हंगामातील अटीतटीचा सामना पहायला मिळाला. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने शेवटच्या चेंडूवर ४ धावांनी बाजी मारली. या सामन्याचा हिरो ठरला तो २२ वर्षीय अर्शदीप सिंग. त्याने अखेरच्या षटकांत समोर संजू सॅमसन आणि ख्रिस मॉरिससाठी आक्रमक फलंदाज असतानाही १३ धावांचा बचाव केला. अर्शदीपचा आत्तापर्यंतचा क्रिकेटप्रवास हा देखील रोमांचक झाला आहे. या लेखातही त्याच्याबद्दल आम्ही एक गोष्ट सांगणार आहोत जी खूप कमी लोकांना माहीत आहे.
या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २२१ धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रतिउत्तरादाख फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला २२२ धावांची आवश्यकता होती. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी पंजाबचा कर्णधार केएल राहुलने अर्शदीप सिंगला दिली होती.
यावेळी राजस्थानला अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज होती. त्याचवेळी अर्शदीप सिंग शतकी खेळी केलेल्या संजू सॅमसनला बाद केले आणि हा सामना पंजाब संघाला ४ धावांनी जिंकवून दिला.
कॅनडा जाण्याची झाली होती तयारी
अर्शदीप सिंगला २०१७ मध्ये कॅनडाला पाठवण्याची पूर्ण तयारी झाली होती. साल २०१८ ला झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या एक वर्षापूर्वी त्याच्या वडिलांनी त्याला कॅनडाला पाठवण्याचे ठरवले होते. त्याचा मोठा भाऊ कॅनडामध्ये शिकण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो तिथेच सेटल झाला होता. त्यामुळे त्याचा वडिलांना वाटू लागले होते की अर्शदीपने ही कॅनडाला जावं आणि तिकडे कारकिर्द घडवावी. पण अर्शदीपने त्यांच्याकडून एक वर्षाच्या कालावधीची मागणी केली. जर वर्षभरात क्रिकेटमध्ये काहीही झाले नाही तर तो कॅनडाला जाईल, असे त्याने सांगितले होते.
१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे केले होते प्रतिनिधित्व
त्यानंतर अर्शदीपने मेहनत घेत २०१८ मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ होता. भारतीय संघाने या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. त्याने या स्पर्धेत २ सामने खेळले होते. यात त्याला ३ गडी बाद करण्यात यश आले होते. यानंतर त्याला २०१९ मध्ये २० लाखांची बोली लावत त्यांना पंजाब संघात स्थान देण्यात आले होते.
त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १२ सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच या विकेट्समध्ये रोहित शर्मा, आंद्रे रसल, मनिष पांडे सारख्या फलंदाजांची नावे आहेत. आता २०२१ आयपीएल हंगामाचीही सुरुवात अर्शदीपने जोरदार केली आहे. हाच फॉर्म तो पुढेही कायम ठेवणार का हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थानविरुद्ध शेवटचे षटक टाकणाऱ्या अर्शदीपने सांगितले संजू सॅमसन विरुद्ध होता ‘हा’ प्लॅन
असं कोण करतं भावा? नाणेफेकीवेळी संजू सॅमसनने केलं असं काही, केएल राहुलसह रेफरीही अचंबित