बांग्लादेश क्रिकेट बोर्डामध्ये (बीसीबी) सध्या अनेक मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. माजी क्रिकेटपटू तमीम इक्बाल याची बीसीबीच्या अंतरिम समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. हे पद स्विकारल्यानंतर त्यांनी लगेचच पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांच्या देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या सामना शुल्काबाबत जाणून त्यांना धक्का बसला. यामुळेच त्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.
बीसीबीची प्रतिष्ठा सुधारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ११ सदस्यांच्या समितीच्या प्रमुखपदी इक्बाल यांची नियुक्ती केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आधी एका महिला क्रिकेटपटूला वनडे सामन्यासाठी केवळ १००० बांग्लादेशी टाका (बीडीटी) म्हणजे अंदाजे ७५४ रुपये दिले जात होते. काही वर्षांपूर्वी हे सामना शुल्क वाढवण्यातही आले होते, त्यामुळे आधीचे शुल्क किती असेल याची कल्पना करा. तसेच महिला क्रिकेटपटूला आता वनडे देशांतर्गत सामन्यांसाठी १५,००० बीडीटी (अंदाजे १२० यूएस डॉलर), प्रथम श्रेणीसाठी २०,००० बीडीटी (अंदाजे १६० यूएस डॉलर) आणि टी२० सामन्यांसाठी १०,००० बीडीटी (अंदाजे ८० यूएस डॉलर) मिळणार आहेत.
त्याचबरोबर अव्वल ३६ देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंचे मासिक वेतन ३०,००० बीडीटी (अंदाजे २४० यूएस डॉलर) वरून ४०,००० बीडीटी (अंदाजे ३२० यूएस डॉलर) पर्यंत वाढवण्यात आले आहे. याबाबत इक्बाल म्हणाला, सर्वांचे वेतन वाढवणे हे आदर्शवादी नाही, मात्र एका वेळी किती वाढ करता येईल यावर मर्यादा असल्याने ही एक सुधारणा आहे. गेल्या ३-४ वर्षात फार कमी पगारवाढ झाली आहे. हे खेळाडू खूप मेहनत करतात आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच क्रिकेटचे अस्तिस्व टिकून आहे. यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना योग्य तो मोबदला मिळायला हवा.
पुरूष देशांतर्गत क्रिकेटपंटूच्या वेतनातही वाढ करण्यात आली आहे. अ श्रेणीमधील खेळाडूंना ६५,००० बीडीटी (अंदाजे ५४० यूएस डॉलर), ब आणि क श्रेणीमधील खेळाडूंना अनुक्रमे ५०,००० बीडीटी (अंदाजे ४१५ यूएस डॉलर) आणि ४०,००० बीडीटी (अंदाजे ३३३ यूएस डॉलर) मिळणार आहेत. प्रथम श्रेणी सामन्यांचे मानधन ७०,००० वरून १,००,००० बीडीटी (अंदाजे ८८३ यूएस डॉलर) करण्यात आले आहे.






