इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटची सर्वात मोठी मालिका समजल्या जाणाऱ्या ऍशेस 2021-22 ची तारीख आता जवळ आली आहे. यावेळी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाला जाईल आणि या मालिकेसाठी यजमानांशी भिडेल. परंतु, जगभरात सुरू असलेल्या महामारीमुळे इंग्लंडचे खेळाडू या दौऱ्याबद्दल चिंतेत आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन जेव्हा इंग्लड खेळाडूंच्या या चिंतेबाबत बोलला, तेव्हा ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार टिम पेन त्याच्यावर चिडला.
त्याने पीटरसनला सल्ला दिला की, खेळाडूंनी दौऱ्यातून माघार घ्यावी की नाही हे त्यांना ठरवू द्यावे, त्याने खेळाडूंना तसे करण्यास प्रवृत्त करू नये.
ऑस्ट्रेलियन सरकारने आपल्या देशात कोविड -१९ पासून संरक्षण करण्यासाठी क्वारंटाईनचे कठोर नियम केले आहेत. याशिवाय परदेशी खेळाडूंनाही त्यांच्या कुटुंबियांसह येथे येण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीत, इंग्लिश खेळाडू या मोठ्या दौऱ्यावर येण्यास मागे-पुढे पाहत आहेत. याबाबत पीटरसनने इंग्लिश खेळाडूंना माघार घेण्यासाठी पाठिंबा दर्शवला होता.
टीम पेनने पीटरसन आणि इतर माजी खेळाडूंवर आरोप केले की, त्यांनी त्यांचे मत देऊन खेळाडूंना प्रभावित करत आहेत.
पीटरसनने ट्विटरवर ऑस्ट्रेलियामधील क्वारंटाईन ठेवण्याच्या नियमांवर टीका केली आणि त्याला हास्यास्पद म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाने लादलेल्या क्वारंटाईन नियमांमुळे पाच सामन्यांच्या ऍशेस दौऱ्यासाठी इंग्लंड क्रिकेटपटूंच्या उपलब्धतेबाबतही शंका आहेत.
मानसिक तणावामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ऍशेस मालिकेसाठी सोबत घ्यायचे आहे, परंतु कोरोना महामारीमुळे कडक प्रवास निर्बंध लक्षात घेता ऑस्ट्रेलियन सरकार या इंग्लडच्या या हालचालींना विरोध करत आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या देशाच्या क्रिकेटपटूंच्या वतीने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ऑस्ट्रेलियाला जाण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे. तथापि, पेनने पीटरसनवर टीका करत म्हटले आहे की, हा निर्णय खेळाडूंवर सोडला पाहिजे.
पेन म्हणाला, ‘पीटरसन प्रत्येक गोष्टीत तज्ञ आहे आणि त्याबद्दल शंका नाही. जर कोणी पीटरसनचा सल्ला ऐकत असेल तर कोणीही इंग्लंडच्या खेळाडूंना येण्यास भाग पाडत नाही. आपण ज्या जगामध्ये राहतो त्याचे हेच सौंदर्य आहे की, आपल्याकडे पर्याय आहे, जर तुम्हाला यायचे नसेल तर येऊ नका.’
तो पुढे म्हणाला, ‘पीटरसनने हे सर्व निर्णय खेळाडूंवर सोडले पाहिजे आणि त्यांना बोलू दिले पाहिजे. आम्ही इंग्लंडच्या एकाही खेळाडूच्या तोंडून ऐकले नाही की ते येणार नाही.’
इंग्लडचा कसोटी कर्णधार रूट म्हणाला आहे की, ‘आम्ही ऍशेससाठी उत्सुक आहोत. परंतु, दौऱ्यावर जाण्यापूर्वी, क्वारंटाईनच्या नियामांबद्दल स्पष्टता हवी आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
सांगली एक्सप्रेस सुसाट! मंधनाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळीसह ७२ वर्षे जुन्या विक्रमालाही धक्का
विक्रमी शतक झळकावल्यानंतर मंधनावर कौतुकाचा वर्षाव, या माजी क्रिकेटरने म्हटले ‘ऑफ साईडची देवी’






