ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या ऍशेस मालिका खेळली जात आहे. ऑस्ट्रेलिया संघ मायदेशात खेळल्या जात असलेल्या या मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेतीर ब्रिस्बेनमध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. सध्या सुरू असलेल्या एडिलेडमधील दुसऱ्या सामन्यात देखील ऑस्ट्रेलिया संघ भक्कम स्थितीत आहे. परंतु चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलिया संघालावर पुढच्या दोन सामन्यांमध्ये काही कडक निर्बंध लादण्यात येणार आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघातील खेळाडूंसाठी पुढच्या दोन कसोटी सामन्यांसाठी काही कडक नियम लागू केले आहे, जे ऐकून प्रत्येक जण हैराण आहे. ऍशेस मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना मेलबर्न आणि सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. पुढचे दोन सामने आयोजित केल्या गेलेल्या या दोन्ही शहरांमध्ये अलिकडच्या काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. याच कारणास्तव खेळाडूंवर हे निर्बंध लागू केले गेले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने लावलेल्या निर्बंधांनुसार खेळाडूंना पुढच्या दोन सामन्यांपर्यंत केस कापता येणार नाहीत, कोणत्याच बारमध्ये जाऊन जल्लोष किंवा आनंद साजरा करता येणार नाही, तसेच कोणत्याच सर्वजनिक जिममध्ये जाऊन व्यायाम देखील करता येणार नाही.
दरम्यान, उभय संघातील दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स एका कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला होता आणि त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या कसोटीत त्याला सहभागी होता आले नाही. दुसऱ्या कसोटीत पॅट कमिन्सच्या जागी ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद स्टीव स्मिथकडे आले आहे. कमिन्स पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आणि मेलबर्न-सिडनीमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हे निर्बंध लावले आहेत. हे निर्बंध ऑस्ट्रेलियन संघासोबतच इंग्लंड संघालाही लागू होणार आहेत.
हे निर्बंध सध्या फक्त पुढच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यापुरते मर्यादित आहेत. पाचव्या सामन्यात काय परिस्थिती असेल याबाबत अद्याप कसलीही स्पष्टता नाही. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात निर्बंध लावले गेले असले, तरी प्रेक्षकांच्या स्टेडियममध्ये येण्यावर कसल्याही प्रकारचा निर्णय घेतला गेला नाही. प्रेक्षक सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर येऊ शकतात, परंतु खेळाडूंचा आणि त्यांचा कसलाही संपर्क येणार नाही याबाबत काळजी घेतली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटला स्थान नाहीच! आता आयसीसी म्हणतेय…
गोलंदाज असूनही अँडरसनने केला फलंदाजीतील ‘न भूतो न भविष्यती’ पराक्रम