सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात प्रतिष्ठित ऍशेस मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला 16 जूनपासून सुरुवात झाली. पहिल्याच कसोटीत बेन स्टोक्स याच्या नेतृत्वातील इंग्लंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, आपल्या बॅझबॉल स्टाईलमध्ये फलंदाजी केली. त्यांनी 8 विकेट्स गमावत 393 धावा चोपल्या आणि अचानक आपला डाव घोषित केला. संघाच्या या निर्णयाने जगाचे लक्ष वेधले होते. आता यावर इंग्लंडच्या माजी कर्णधारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय म्हणाला मायकल वॉन?
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) म्हणाला की, जर तो कर्णधार असता, तर त्याने डाव घोषित केला नसता. विशेषत: जो रूटसोबत. 48 वर्षीय वॉन असेही म्हणाला की, इंग्लंड एक संदेश देण्याचा प्रयत्न करत होता, जो आधी कुठल्याही संघाने केला नव्हता.
डाव घोषित केल्यानंतर माध्यमांशी बोलताना वॉन म्हणाला की, “मी घोषित केला नसता. तुम्हाला आताच माहिती नाहीये की, काय होणार आहे. इंग्लंड एक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे, जो आधी कुठल्याही संघाने केले नाहीये. मी, एक कर्णधार म्हणून आणखी काही धावांची अपेक्षा करत होतो, खासकरून रूटसोबत. जरी इंग्लंडला विकेट मिळाली नाही, पण ऍशेसचा अर्थ काय आहे? वॉर्नर आणि ख्वाजा, दोन्ही अनुभवी व्यावसायिक खेळाडू मुलांसारखे धावत होते.”
पीटरसनने केले भाष्य
केविन पीटरसन (Kevin Pietersen) यानेही बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्या निर्णयावर टीकास्त्र डागले. 42 वर्षीय पीटरसनने दावा केला की, दुसरा दिवस सर्वात शानदार होऊ शकला असता. पहिल्या डावात 400 किंवा 450ची धावसंख्या योग्य मानली जाते.
तो म्हणाला की, “मला वाटत नाही की, त्याचे नेतृत्व मैदानात आणि मैदानाबाहेर एकसारखे आहे. याचे उत्तर देणे कठीण आहे. कारण, आम्ही आज सायंकाळी यामध्ये जास्त काही पाहिले नाही आणि मी मागील वर्षी भारताविरुद्धचा कसोटी सामना तुमच्यासोबत केला होता. ही एक अशी खेळपट्टी होती, जी फलंदाजीसाठी चांगली झाली होती. मला वाटते की, शनिवारी सर्वात चांगला दिवस असू शकतो. त्यामुळे मी खुश आहे. मला घोषणा आवडली नाही.”
सामन्याचा पहिला दिवस
ऍशेस 2023 (Ashesh 2023) मालिकेच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 8 बाद 393 धावांवर डाव घोषित केला होता. यजमान संघाकडून जो रूट (Joe Root) याने नाबाद 118 धावांची शतकी खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त जॉनी बेअरस्टोने 78 धावांचे योगदान दिले. तसेच, पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 14 धावा केल्या होत्या. (ashes 2023 eng vs aus former captain kevin pieterson michael vaughan slams ben stokes declaration decision)
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये झळकणार ‘हा’ भारतीय क्रिकेटर, 8 वर्षे केलंय देशाचं प्रतिनिधित्व
सर्वोत्तम कसोटी कर्णधारांमध्ये गणला जाणारा दिग्गज रोहितविषयी स्पष्टच बोलला; म्हणाला, ‘त्याला आराम…’