ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सध्या केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंड संघाने आपल्या चिरपरिचित अंदाजात आक्रमक फलंदाजी करताना दुसऱ्या डावात 9 बाद 389 धावा केल्या. त्यामुळे आता इंग्लंडकडे 377 धावांची आघाडी आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडचा उर्वरित एक बळी मिळवून त्यानंतर जवळपास दोन दिवस फलंदाजी करत विजय मिळवण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर असेल.
यापूर्वीच ऍशेस नावावर केलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काहीसा संथ खेळ दाखवला. दिवस संपताना त्यांनी 12 धावांची छोटीशी आघाडी घेतली होती. या छोट्याशा पिछाडीसह तिसऱ्या दिवशी मैदानात पाऊल ठेवल्यावर झॅक क्राऊली व बेन डकेट या सलामीवीरांनी पहिल्याच षटकात 13 धावा काढत संघाला आघाडीवरील नेले. त्यानंतर इंग्लंडचे फलंदाज थांबले नाही.
क्राऊली व बेन यांनी संघाला 79 धावांची सलामी दिली. क्राऊली याने आक्रमक अर्धशतक झळकावले. डकेट व त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी 42 धावा केल्या. ब्रूक 7 धावांवर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा जो रूट व बेअरस्टो यांनी अर्धशतके करत इंग्लंडचे आघाडी 300 पार नेली आहे. रूटने अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन करत 106 चेंडूवर 91 तर बेअरस्टोने 78 धावांची खेळी केली. मोईन अलीने 29 धावा केल्या. त्यानंतर त्यांचे चार गडी झटपट बाद झाले. अखेर जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांनी दिवसातील अखेरची तीन षटके खेळून काढत संघाला सर्वबाद होण्यापासून वाचवले. ऑस्ट्रेलियासाठी स्टार्कने 4 तर मर्फीने 3 बळी मिळवले.
(Ashes 2023 Oval Test England Show Bazball Again Lead Goes 370 Plus)