मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) ऍशेस मालिका २०२१-२२ (Ashes Series) मधील तिसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रविवारपासून (२६ डिसेंबर) सुरू झाला आहे. बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) असलेल्या या सामन्याचा सोमवारी (२७ डिसेंबर) दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. तरी, दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने सामन्यावरील पकड मजबूत केली आहे.
दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंड संघ दुसऱ्या डावात १२ षटकांमध्ये ४ बाद ३१ धावा अशा स्थितीत आहे. तसेच ऑस्ट्रेलियाकडे ५१ धावांची आघाडी आहे.
ऑस्ट्रेलियाचा डाव २६७ धावांवर संपुष्टात
दुसऱ्या दिवसाची सुरुवात ऑस्ट्रेलियाने १६ षटकांपासून आणि १ बाद ६१ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. मात्र, ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. चांगल्या सुरुवातीनंतरही प्रमुख फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. पण, असे असले तरी, एक बाजू सलामीवीर मार्कस हॅरिसने लावून धरली होती. त्याने एका बाजूने भक्कम खेळ करत अर्धशतक झळकावले.
त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला ८७.५ षटकात सर्वबाद २६७ धावाच करता आल्या. पण इंग्लंडचा पहिला डाव १८५ धावांवरच संपला असल्याने ऑस्ट्रेलियाला ८२ धावांची आघाडी मिळाली.
अधिक वाचा – Ashes: इंग्लंडसाठी पहिले पाढे पंचावन्न! बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्कस हॅरिसने सर्वाधिक ७६ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ डेव्हिड वॉर्नरने ३८ धावांची खेळी केली. तसेच तळात कर्णधार पॅट कमिन्सने २१ आणि मिशेल स्टार्कने २४ धावांचे योगदान दिले. स्टीव्ह स्मिथ (१६), मार्नस लॅब्यूशेन (१), ट्रेविस हेड (२७), कॅमेरॉन ग्रीन (१७) आणि ऍलेक्स कॅरे (१९) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.
इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच ऑली रॉबिन्सन आणि मार्क वूडने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. याशिवाय बेन स्टोक्स आणि जॅक लीचने प्रत्येकी १ विकेट घेतली.
व्हिडिओ पाहा – बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही… |
दुसऱ्या डावातही इंग्लंडची खराब कामगिरी
दुसऱ्या डावात देखील इंग्लंडची हाराकिरी सुरुच राहिली. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने झॅक क्रॉली (५) आणि डेविड मलान (०) यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत इंग्लंडला डावाच्या सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. इतकेच नाही, तर पदार्पणवीर स्कॉट बोलंडने एकाच षटकात सलामीवीर हसीब हमीद (७) आणि नाईटवॉचमन म्हणून खेळायला आलेल्या जॅक लीचला (०) बाद केले.
त्यामुळे इंग्लंडवर ११ षटकांमध्येच ४ विकेट्स गमावण्याची वेळ आली. दिवसाखेर इंग्लंडकडून कर्णधार जो रूट १२ धावांवर आणि अष्टपैलू बेन स्टोक्स २ धावांवर नाबाद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“वनडे आणि कसोटी संघासाठी वेगवेगळे कर्णधार असणे योग्य”, रवी शास्त्रींची मोठी प्रतिक्रिया
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काय होती राहुल-मयंक यांची रणनिती? स्वतः सलामीवीराने केला खुलासा
Video: अजिंक्य रहाणे फलंदाजी करताना वारंवार करत होता ‘या’ मंत्राचा जप, कॅमेऱ्यात झाले कैद