मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) संघात ऍशेस मालिकेतील (Ashes Series) तिसरा सामना रविवारपासून (२६ डिसेंबर) सुरू झाला. हा बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामना आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानात होत असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व दिसून आले. पहिल्याच दिवशी इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला असून ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १ बाद ६१ धावा केल्या आहेत.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) योग्य ठरवत पहिल्याच सत्रात इंग्लंडच्या पहिल्या तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याला मिशेल स्टार्क, नॅथन लायन, कॅमेरॉन ग्रीन आणि स्कॉट बोलंड यांनी चांगली साथ दिली.
इंग्लंडने सलामीवीर हसीब हमीद (०) याची दुसऱ्याच षटकात विकेट गमावली होती. झॅक क्रॉली (१२) आणि डेविड मलान (१४) यांना देखील कमिन्सने स्वस्तात बाद केले. पण, यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने (Joe Root) एकाकी झुंज दिली होती. मात्र, त्याला ५० धावांवर मिशेल स्टार्कने यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरीच्या हातून झेलबाद केले.
त्याच्यानंतर बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टोने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. स्टोक्स २५ आणि बेअरस्टो ३५ धावा करून बाद झाले. त्यानंतर मात्र, रॉबिन्सनव्यतिरिक्त कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव ६५.१ षटकांत केवळ १८५ धावांवर संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच मिशेल स्टार्कने २ विकेट्स घेतल्या, तर स्कॉट बोलंड आणि कॅमेरॉन ग्रीनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
अधिक वाचा – वनडेत कोहली, टी२०त आझम अन् कसोटीत रूट; धावांच्या ‘मोठ्या’ विक्रमांत हे कर्णधारच राहिलेत नंबर १
ऑस्ट्रेलियन सलामीवीरांची चांगली सुरुवात
इंग्लंडचा पहिला डाव १८५ धावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीसाठी उतरला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरीस या सलामीवीरांच्या जोडीने चांगली सुरुवात केली. या दोघांनी सलामीला अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र, दिवसाचा खेळ अखेरच्या टप्प्यात आलेला असतानाच वॉर्नर ४२ चेंडूत ३८ धावा करून बाद झाला. त्यामुळे नॅथन लायन नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीसाठी आला.
अखेर दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया १६ षटकांत १ बाद ६१ धावांवर आहे. हॅरिस २० धावांवर नाबाद आहे, तर लायन शुन्यावर नाबाद आहे.
व्हिडिओ पाहा – बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही…
इंग्लंडसाठी करो वा मरो सामना
इंग्लंड संघासाठी तिसरा कसोटी सामना करो वा मरो स्थितीतील सामना आहे. कारण, पहिल्या दोन्ही सामन्यात इंग्लंडला त्यांच्या खराब कामगिरीमुळे पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे जर तिसरा सामनाही गमावला, तर इंग्लंडवर मालिकेत पराभव स्विकारण्याची वेळ येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘अंतर्गत संभाषण मीडियासमोर आणणार नाही’, भारताच्या नेतृत्त्वबदलाबाबत राहुल द्रविडचे मोठे भाष्य
दुख:द! माजी इंग्लिश कर्णधाराचे निधन, प्रथम श्रेणीत नावे होत्या २४ हजार धावा अन् २००० विकेट्स