ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळली जाणारी ऍशेस मालिका या ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी उभय संघ मैदानात घाम गाळताना पाहिले गेले. इंग्लंड संघाने काही सराव सामने खेळले आहे, तर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू देखील कसून सराव करत आहेत. अशातच ऑस्ट्रेलिया संघाचा नवीन कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने पहिल्या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. त्याने ही घोषणा या ऍशेस मालिकेच्या अधिकृत घोषणेवेळी केली. जो रूटने मात्र इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यास नकार दिला.
कमिन्सने यावेळी सांगितल्याप्रमाणे पहिल्या सामन्यात सलामीवीराच्या रूपात डेविड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस यांना निवडले गेले आहे. वरच्या फळीतील फलंदाजाच्या रूपात स्टीव स्मिथ आणि मार्नस लॅबूशेन यांच्यावर चांगली खेळी करण्याची जबाबदारी असेल. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीत ट्रेविस हेड, कॅमरून ग्रीन आणि यष्टीरक्षक फलंदाज एलेक्स कॅरी याना सामील केले गेले आहे. संघात वेगवान गोलंदाजाच्या रूपात कर्णधार पॅट कमिन्स, जोश हेजलवुड आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश असेल, फिरकी गोलंदाजाच्या रूपात नाथन लायनचा समावेश केला गेला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीसाठी निवडलेल्या संघात उस्मान ख्वाजा, माइकल नेसर, झाय रिचर्डसन आणि मिचेल स्वेप्सन यांना संधी दिलेली नाही.
पॅट कमिन्सने पहिल्या सामन्याच्या दोन दिवस आधीच त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली असली, तरी इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटने मात्र अद्याप प्लेइंग इलेव्हन जाहीर केलेली नाही. जो रूटने यामागचे कारण देखील सांगितले. तो म्हणाला की, “फिरकी गोलंदाज जॅक लीज खेळण्यासाठी स्पर्धेत कायम आहे. आमच्याकडे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही आता एका संघाचे नाव घेणार नाही. आम्हाला जवळून पाहावे लागेल की, पुढच्या काही दिवसात खेळपट्टी कशी बदलते. हे मैदान फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी उत्तम आहे. पण, आम्ही सामन्याच्या आधी, आत्ता प्लेइंग इलेव्हन निवडण्याच्या स्थितीमध्ये नाही.”
ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हन – मार्कस हॅरिस, डेविड वार्नर, मार्नस लॅबूशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवुड.