ब्रिस्बेनच्या मैदानावर ऍशेस मालिकेला जोरदार प्रारंभ झाला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेची कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहिली जात होती. या मालिकेतील पहिला कसोटी सामन्याला ८ डिसेंबर पासून प्रारंभ झाला आहे. या सामन्यात सुरुवातीच्या दोन्ही दिवशी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. पहिल्या (८ डिसेंबर) दिवशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. तर दुसऱ्या दिवशी (९ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाजांनी वर्चस्व गाजवल्याचे पाहायला मिळाले. ज्यामुळे इंग्लंड संघ पूर्णपणे बॅकफूटवर पडला. दरम्यान दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स दुखापतग्रस्त झाला आहे. बेन स्टोक्सला पहिल्या डावातील २९ व्या षटकात दुखापत झाली होती. त्यानंतर तो खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसून आला होता. याच दुखापतीमुळे तो गोलंदाजी करताना दिसून आला नव्हता. त्यामुळे नक्कीच इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ होऊ शकते.
ईएसपीएनक्रीकइन्फोच्या वृत्तानुसार, इंग्लंडचे गोलंदाजी प्रशिक्षक जॉन लुईस यांनी म्हटले की, “आज बेन स्टोक्सला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने दिवसाच्या शेवटी पूर्ण गतीने गोलंदाजी केली नाही. आमचे डॉक्टर रात्रभर त्याच्यावर लक्ष ठेवून असतील.” बेन स्टोक्सने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ९ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ५० धावा खर्च केल्या.
पहिल्या दोन दिवशी इंग्लंड संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. परंतु इंग्लंडच्या गोलंदाजी प्रशिक्षकांना विश्वास आहे की, इंग्लंडचा संघ जोरदार पुनरागमन करेल. त्यांनी म्हटले की, “आमचा संघ हार मानणारा नाहीये. आम्ही उद्या जोरदार लढत देऊ.”
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर इंग्लंड संघाचा पहिला डाव १४७ धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाकडून जोरदार लढत पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलिया संघाकडून ट्रेवीस हेडने सर्वाधिक १५२ धावांची खेळी केली, तर डेविड वॉर्नरने ९४ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने ४२५ धावांचा डोंगर उभारत मोठी आघाडी घेतली.
महत्वाच्या बातम्या :
कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा एजाज आयपीएल खेळण्याबाबत म्हणाला असं काही,
मातब्बर गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकमधून बाहेर झाली विराटची पत्नी अनुष्का शर्मा, पण का?