इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (दि. 06 जुलै) सुरुवात झाली. लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने संधीचा फायदा घेतला नाही. एकेवेळी ऑस्ट्रेलिया संघ 4 बाद 240 धावांवर खेळत होता. मात्र, इंग्लंडने शानदार पुनरागमन करत 23 धावांच्या आत 6 विकेट्स काढल्या. तसेच, ऑस्ट्रेलिया 263 धावांवर सर्वबाद झाला
इंग्लंड संघाकडून यावेळी मार्क वूड (Mark Wood) याने शानदार गोलंदाजी केली. त्याने 11.4 षटकात 34 धावा खर्चून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट (Joe Root) याने 12 धावांवर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) याचा झेल सोडला. याचा फायदा घेत मार्शने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. त्याने यावेली 118 चेंडूत 118 धावांची वादळी खेळी साकारली. यामध्ये 17 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी पर्याय म्हणून खेळत असलेला मार्श जवळपास चार वर्षांनंतर पहिला कसोटी खेळतोय. या सामन्यात त्याने 118 धावांची शानदार शतकी खेळी साकारली. जर रूटने 12 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर मार्शचा झेल पकडला असता, तर ऑस्ट्रेलिया संघ 5 विकेट्सनंतर 98 धावांवर अडखळला असता. मार्शने 118 धावांची आक्रमक खेळी साकारताना 17 चौकार आणि 4 षटकारांचीही बरसात केली.
ख्रिस वोक्स याने मार्शचा झेल झॅक क्राऊले याच्या हातात देऊन इंग्लंडला पाचवी विकेट मिळवून दिली. त्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी डेविड वॉर्नर (David Warner) याने स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याच्या गोलंदाजीवर सामन्याचा पहिलाच चेंडू चौकारासाठी पाठवला. मात्र, षटकातील पाचव्या चेंडूवर ब्रॉडने वॉर्नरला झॅक क्राऊलेच्या हातून तंबूत पाठवले.
फिटनेसशी संबंधित कारणांमुळे पहिल्या दोन कसोटीतून बाहेर असलेल्या वुडने आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना सतावले. त्याने सुरुवातीचे तीन षटके निर्धाव टाकली. तसेच, पहिली धाव ही 23व्या चेंडूवर दिली. वूडने वेगवान आणि स्विंग होत असलेल्या चेंडूवर सलामीवीर उस्मान ख्वाजा (13) याला त्रिफळाचीत करून ऑस्ट्रेलियाला दुसरी विकेट मिळवून दिली.
जॉनी बेअरस्टो याने 100वा कसोटी सामना खेळत असलेल्या स्मिथचा झेल पकडण्यात अपयशी ठरला. मात्र, वोक्सने मार्नस लॅब्युशेन (21) याला रूटच्या हातून झेलबाद केले. बेअरस्टोने यानंतर वूडच्या चेंडूवरच हेडला जीवनदान दिले. ब्रॉडने शानदार पुनरागमन करत स्मिथला 22 धावांवर बेअरस्टोच्या हातून झेलबाद करत तंबूत पाठवले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने 85 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या.
इंग्लंडने गमावल्या सुरुवातीच्या दोन विकेट्स
दुसरीकडे, इंग्लंड संघ फलंदाजीला उतरला असून त्यांनी पहिल्या दोन विकेट्सही गमावल्या आहेत. 11 षटकांच्या खेळानंतर इंग्लंड संघाने 2 बाद 54 धावा केल्या. यामध्ये झॅक क्राऊले नाबाद 27 धावा आणि जो रूट 15 धावांवर खेळत आहेत. तसेच, बेन डकेट (2) आणि हॅरी ब्रूक (3) यांनी विकेट गमावली आहे. या दोन्ही विकेट्स पॅट कमिन्स याने अनुक्रमे चौथ्या आणि सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर घेतल्या आहेत. (ashes test 2023 after 4 wickets for 240 australia all out for 263)
महत्वाच्या बातम्या-
माजी सलामीवीराचे धक्कादायक विधान! पहिल्यांदाच भारतीय संघात निवडलेल्या तिलकबद्दल म्हणाला, ‘चुकीचा निर्णय…’
भारतीय संघाला मोठा झटका! टी20 मालिकेपूर्वीच स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, लगेच वाचा