ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ (Australian Open 2022) च्या महिला एकेरीचे विजेतेपद जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीने (Ashleigh Barty) जिंकले. बार्टीने अंतिम फेरीत अमेरिकेच्या डॅनियला कॉलिन्सचा सरळ सेटमध्ये पराभव करून तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. शनिवारी (२९ जानेवारी) रोजी रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या या अंतिम फेरीत बार्टीने कॉलिन्सचा ६-३, ७-६ असा पराभव करून पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. यासोबतच तीने इतिहासही रचला. ४४ वर्षात महिला एकेरीचे ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद जिंकणारी ती पहिली ऑस्ट्रेलियन महिला ठरली आहे. ख्रिस ओ’नीलने तिच्या आधी १९७८ मध्ये शेवटचे विजेतेपद पटकावले होते.
हा अंतिम सामना अनेक अर्थांनी खास होता. कारण, दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. बार्टीची ही केवळ तिसरी अंतिम फेरी होती, तर कॉलिन्स पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. खरेतर, कॉलिन्सने प्रथमच ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे आगेकूच केली होती. मात्र, तिच्या या चमकदार प्रवासाचे अंतिम फेरीत विजेतेपदात रुपांतर झाले नाही. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक स्टार बार्टीसमोर तिचे विजेतेपदाचे स्वप्न अधुरेच राहिले.
ऍशले बार्टीचे हे तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या बार्टीने २०१९ मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर बार्टीला पुढील विजेतेपदासाठी तिला दोन वर्षे वाट पाहावी लागली. तिने गेल्या वर्षी २०२१ मध्ये विम्बल्डनच्या अंतिम फेरीत कॅरोलिना प्लिस्कोव्हाला पराभूत करून तिचे दुसरे ग्रँडस्लॅम जिंकले होते
महत्वाच्या बातम्या-.