ऍडलेड कसोटी सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर मेलबर्नवरील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी जिंकत भारताने मालिकेत दमदार पुनरागमन केले. ८ विकेट्सने हा सामना जिंकत भारताने मालिकेत १-१ने बरोबरी साधली. या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची पुरती दैना करुन सोडली. त्यातही भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने संघाला महत्त्वपुर्ण विकेट्स मिळवून दिल्या. आपल्या या जबरदस्त गोलंदाजी दरम्यान अश्विनने माजी श्रीलंकन दिग्गज मुथैय्या मुरलीधरन यांचा विश्वविक्रम तोडला.
जोश हेजलवुडला बाद करत केला ‘विश्वविक्रम’
अश्विनने ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जोश हेजलवुडची विकेट घेतली. यासह अश्विनने मुरलीधरनचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा विश्वविक्रम मोडला आहे.
फिरकीपटू मुरलीधरनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण ८०० विकेट्स घेतल्या असून त्यातील १९१ फलंदाज हे डावखुरे होते. अशाप्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक १९१ डाव्या हाताच्या फलंदाजांना बाद करण्याचा मोठा किर्तीमान मुरलीधरनने आपल्या नावे केला होता. परंतु अश्विनने कसोटीत केवळ ३७५ विकेट्स घेत त्यांचा हा विश्वविक्रम मोडला आहे.
वेगवान गोलंदाजांविषयी बोलायचे झाले, तर कसोटीत सर्वाधिक डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम जेम्स अंडरसनने केला आहे. इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत १८६ वेळा डाव्या हाताच्या फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले आहे.
कसोटी मालिकेत अश्विनने केली नेत्रदिपक गोलंदाजी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये अश्विनचे वेगळेच रुप पाहायला मिळाले आहे. अश्विन परदेशातील मैदानावर त्याच्या सरासरी गोलंदाजीसाठी कुप्रसिद्ध आहे. पण यावेळी यजमान ऑस्ट्रेलिया संघाच्या दिग्गज क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथला अश्विनने दोन वेळा बाद केले आहे.
ऍडलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यात त्याने एकूण ५ विकेट्स घेतल्या आहेत. यात पहिल्या डावातील ४ आणि दुसऱ्या डावातील एका विकेटचा समावेश आहे. तर मेलबर्न येथील दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने ५ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“अरे अजिंक्य दादा, शुबमनला ३० धावा करू द्यायच्या ना, म्हणजे…” ऑस्ट्रेलियन अँकरची रहाणेकडे खास मागणी
साधं अर्धशतकही करता आलं नाही! तब्बल ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत घडलंय ‘असं’
कॅप्टनकूल नंतर फक्त रहाणे..! बॉक्सिंग डे कसोटी जिंकत अजिंक्यची धोनीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी