एशिया कप स्पर्धेत आपल्याला खूप चुरशीचे सामने पाहयला मिळाले. सुुपर फोर फेरीचे सामने तर आणखीनच उत्कंठावर्धक ठरले. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहीला. अफगाणिस्तानच्या संघाने तगड्या भारतीय संघाला बरोबरीत रोखले. तर भारताने, बांगलादेश आणि पाकिस्तानला चांगलेच झुंजवले.
5 वेळचा एशिया कप विजेता श्रीलंका संघ साखळी फेरीतच बाहेर पडला. अंतिम सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. भारतीय संघाने सगळ्यात सरस कामगिरी करत 7 व्यांदा एशिया कपवर आपले नाव कोरले.
एशिया कप स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा संघ महास्पोर्ट्सने बनवला आहे, त्याला एशिया एलेव्हन असे नाव दिले आहे.
भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि अफगाणिस्तानचा सलामीचा फलंदाज मोहम्मद शहजाद या दोन्ही फलंदाजांचा या स्पर्धेतील फॉर्म जबरदस्त होता. शिखरने या स्पर्धेत दोन शतकांच्या मदतीने 342 धावा केल्या आहेत. त्याने 68 च्या सरासरीने आणि 102 च्या स्ट्राइक रेटने धावा कुटल्या. मोहम्मद शहजादने एकूण 5 सामन्यात 53.60 च्या सरासरीने 268 धावा केल्या आहेत. त्याने भारताविरूद्ध सुपर फोरच्या सामन्यात आक्रमक शतक ठोकले होते.
एशिया कप विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा एशिया एलेव्हनचा कर्णधार म्हणून योेग्य ठरतो. त्याने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत स्पर्धेत 5 सामन्यात तब्बल 105 सरासरीने 317 धावा केल्या आहेत.
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोेएब मलिकने पाकिस्तानच्या संघाला वेळोवेळी सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या खेळीच्या बळावरच पाकिस्तानला अफगाणिस्तानविरूद्च्या सामन्यातील पराभव टाळता आला होता.
शोएबने 70 च्या सरासरीने 211 धावा केल्या आहेत. तो मधल्या फळीतील एक महत्वाचा फंलदाज आहे. त्याच बरोबर त्याने पार्टटाइम गोलंदाज म्हणून देखील चांगले काम केले.
अंबाती रायडूने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताकडून नंबर 3 ला फलंदाजीला येऊन दमदार फलंदाजी केली. त्याने 6 सामन्यात 43 च्या सरासरीने 175 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात केएल राहुल सोबत सलामीला येत 57 धावांची आक्रमक खेळी केली होती.
बांगलादेशने अंतिम फेरीत प्रवेश केला त्यात सर्वात महत्वाचा वाटा होता, विकेटकिपर मुश्फिकीर रहीमचा, मुश्फिकीरने 5 सामन्यात 302 धावा केल्या. श्रीलंकेसोबत झालेल्या पहिल्याच सामन्यात त्याने शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 99 धावांची महत्वाची खेळी केली होती.
केदार जाधवच्या पायाला वेदना जाणवत असताना देखील भारतीय संघाला फंलदाजीला येवून शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाला एशिया चषक स्पर्धेत भारताला विजय मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने गोलंदाजीत देखील महत्वाची कामगिरी केली. त्याने स्पर्धेत 6 फलंदाजांना घरचा दाखवला. भागिदारी तोडण्यात त्याने आतापर्यंत यश मिळवले आहे. कर्णधाराने जेव्हा जेव्हा केदारला हातात चेंडू दिला तेव्हा तेव्हा त्याने आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
राशिद खान अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज स्पर्धेतील सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने 5 सामन्यात 10 बळी मिळवत आपली छाप सोडली आहे. भारताविरद्धच्या सामन्यात त्याने शेवटच्या षटकात शेवटच्या दोन चेंडूवर एका धावेची आवश्यकता असताना रविंद्र जडेजाला बाद करत सामना बरोबरीत सोडला होता.
कुलदीप यादवने देखील यास्पर्धेत अप्रतिम गोंलदाजी करताना 6 सामन्यात 10 बळी मिळवले आहेत. फलंदाजाला चायनामॅन कुलदीपच्या गोलंदाजीला फटका मारण्याचा मोह आवरत नाही आणि आपली विकेट गमावून बसतो.
जसप्रित बुमराह भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा आहे. डेथ ओव्हर मध्ये बुमराहचा सामने करणे अवघड आहे. त्याचे डॉट यॉर्करने फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले आहे. त्याने या स्पर्धेत 4 सामन्यात 8 बळी मिळवले आहेत. त्याची इकॉनॉमी(3.67) चार पेक्षा जास्त सामने खेळलेल्या वेगवान गोलंदाजात सर्वात जास्त आहे.
मुस्तफिझुर रहमानने पाकिस्तानविरूद्धच्या अतिशय महत्वाच्या सामन्यात 43 धावात 4 फलंदाजांना बाद करत बांग्लादेशच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला होता. त्याने पाच सामन्यात 10 बळी मिळवले आहेत.
एशिया एलेव्हन संघ याप्रमाणे-
शिखर धवन (भारत), मोहम्मद शहजाद(अफगाणिस्तान), रोहित शर्मा( कर्णधार भारत), शोेएब मलिक(पाकिस्तान), अंबाती रायडू (भारत), मुश्फिकीर रहीम(यष्टीरक्षक बांग्लादेश), केदार जाधव(भारत), राशिद खान(अफगाणिस्तान), कुलदीप यादव(भारत), जसप्रित बुमराह(भारत), मुस्तफिझुर रहमान(बांग्लादेश).
महत्वाच्या बातम्या-
–विंडिज विरुद्ध कोहलीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; काय आहे कारण जाणून घ्या
–भारत-बांगलादेश अंतिम सामन्याची तिकिटे नाराज पाकिस्तानी चाहत्यांनी विकली
–कर्णधार म्हणून धोनी पराभूत व्हावा असे मला वाटत नव्हते म्हणून मी रडलो