दुबई। उद्या (19 सप्टेंबर) एशिया कप 2018 ला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महत्वाचा सामना होणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 4:30 वाजता सुरू होईल.
पाकिस्तानने त्यांचा या स्पर्धेतील पहिला विजय नवोदीत हाँग काँग विरुद्ध 8 विकेट्सने सहज मिळवला आहे. तर भारताचा आज (18 सप्टेंबर) पहिला सामना हाँग काँग विरुद्ध होत आहे.
25000 हजार आसनक्षमता असलेल्या दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पहील्या डावातील
सरासरी 223 असून दुसऱ्या डावातील सरासरी 203 ची आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय टॉस जिंकणारा संघ घेण्याची शक्यता आहे.
या स्पर्धेत भारतीय संघ विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणार असून भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार म्हणून रोहित शर्मा कर्णधार पदाची धुरा आपल्या खांद्यावर वाहणार आहे.
असे असले तरी भारतीय फलंदाजी मजबूत असून पाकिस्तानच्या गोलंदाजीचा सामना कशी करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भुवनेश्वर कुमार दुखापती मधून सावरला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजीची धार वाढली आहे.
मात्र भारतासाठी मधल्या फळीत कोणाला खेळवायचे हा मोठा प्रश्न आहे. भारताकडे त्यासाठी अनेक पर्याय आहेत. यात अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, केएल राहुल असे पर्याय आहेत. पण यातील कोणाला संधी मिळते हे पहावे लागेल.
त्याचबरोबर गोलंदाजीसाठी भारताकडे फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल आहे, तर त्यांना साथ देण्यासाठी अष्टपैलू अक्षर पटेल असेल. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजांच्या फळीत जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, खलील अहमद आहे. तसेच तळातील फलंदाजीला भक्कम बनवण्यासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याही आहे.
पाकिस्तान संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. सरफराज अहमद पाकिस्तान संघाचे नेतृत्व करणार आहे. शोएब मलिक हा सर्वात अनुभवी खेळाडू असणार आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा संघाला होईल.
वेगवान गोलंदाजी हे पाकिस्तानचे प्रमुख अस्र असणार आहे. त्यात मोहम्मद आमीर आणि हसन अली हे वेगवान गोलंदाज महत्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांच्या नवोदित फलंदाजांनी झिम्बॉब्बे दौऱ्यात दमदार कामगिरी केली आहे.
भारत आणि पाकिस्तान हे संघ वनडेमध्ये आत्तापर्यंत 129 वेळा आमने सामने आले असून यात भारताने 52 सामन्यात बाजी मारली आहे तर पाकिस्तानने 73 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच 4 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.
याबरोबरच हे दोन संघ एशिया कपमध्ये वनडेत 11 वेळा आमने सामने आले आहेत. यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 सामने जिंकले असून 1 सामना अनिर्णित राहिला आहे.
तसेच 2016 ला टी20 प्रकारात खेळलेल्या एशिया कपमध्ये या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता.
भारत विरुद्ध पाकिस्तान कधी होणार आहे एशिया कपमधील सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील एशिया कपचा सामना 19 सप्टेंबर 2018 ला होणार आहे.
कोठे होईल भारत विरुद्ध पाकिस्तान एशिया कपमधील सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान एशिया कपमधील सामना दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
किती वाजता सुरु होईल भारत विरुद्ध पाकिस्तान एशिया कपमधील सामना?
भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील एशिया कपमधील सामन्याला सुरुवात होईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील एशिया कपमधील सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?
स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 सिलेक्ट, स्टार स्पोर्ट्स 1 सिलेक्ट एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी 1 आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी 1 एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील एशिया कपमधील सामना पाहता येणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील एशिया कपमधील सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?
hotstar.com या वेबसाईटवर भारत विरुद्ध पाकिस्तान एशिया कपमधील सामना ऑनलाइन पाहता येईल.
यातून निवडला जाईल 11 जणांचा संघ:
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन(उपकर्णधार), केएल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव,
युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, खलील अहमद आणि अक्षर
पटेल.
पाकिस्तान: सर्फराज अहमद (कर्णधार), फकार जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम, शान मसूद, शोएब मलिक, हरीस सोहेल, शदाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, हसन अली, जुनैद खान, उस्मान खान, शाहीन अफ्रिदी, आसिफ अली , मोहम्मद अमीर.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारताकडून पदार्पण करत असलेला कोण आहे खलील अहमद
–एशिया कप २०१८: भारत विरुद्ध हाँग काँग सामन्याबद्दल सर्वकाही
–रोहित शर्मा एशिया कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्यास उत्सुक