यजमान पाकिस्तान संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेत शानदार सुरुवात केली. 30 ऑगस्ट रोजी झालेल्या उद्घाटनाच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध नेपाळ आमने-सामने होते. या सामन्यात पाकिस्तानने नेपाळ संघाचा तब्बल 238 धावांनी धुव्वा उडवला. या विजयाचा हिरो बाबर आझम ठरला. त्याने या सामन्यात शतक झळकावल्यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता भारताचा माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ता याने बाबरचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की, बाबर आझमची फलंदाजी पाहून डोळ्यांना सुखावणारी वाटते.
काय म्हणाला दीप दासगुप्ता?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना दीप दासगुप्ता (Deep Dasgupta) याने बाबर आझम (Babar Azam) याचे कौतुक केले. तो म्हणाला, “बाबर आझमला फलंदाजी करताना पाहणे खूपच चांगले वाटते. त्याची फलंदाजी डोळ्यांना सुखावणारी असते. जरी नेपाळ संघ समोर होता, पण तुम्हाला हेदेखील ध्यानात घेतले पाहिजे की, नेपाळने किती चांगली गोलंदाजी केली आहे.”
पुढे बोलताना तो असेही म्हणाला, “40व्या षटकात नेपाळ संघ सामन्यात कायम होता. बाबर आझमला या धावा करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. कारण, परिस्थिती फलंदाजीसाठी तितकी चांगली नव्हती. येथे खूपच उकाडा आणि दव होते. नेपाळने खूपच शिस्तबद्ध गोलंदाजी केली होती. बाबर आझमसाठी हे शतक सोपे नव्हते. जरी पाकिस्तानविरुद्ध हे आले असले, पण यासाठी त्याला खूपच समस्यांचा सामना करावा लागला.”
बाबर आझमची शतकी खेळी
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 6 विकेट्स गमावत 342 धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये बाबरच्या शतकाचाही समावेश होता. बाबरने 131 चेंडूत 4 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने 151 धावांची शानदार खेळी साकारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळ संघ 23.4 षटकात अवघ्या 104 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे त्यांना 238 धावांनी लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे पाकिस्तानने स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे.
पाकिस्तानचा पुढील सामना भारताविरुद्ध आहे. हा सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे खेळळा जाणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (asia cup 2023 former indian wicketkeeper praises babar azam century vs nepal read here)
हेही वाचाच-
राहुलच्या दुखापतीविषयी स्पष्टच बोलला मोहम्मद कैफ; म्हणाला, ‘ही भारतीय संघासाठी चांगली…’
‘शाहीन आफ्रिदीने विराटला…’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी स्पष्टच बोलला दिग्गज; लगेच वाचा