आशिया कप 2025 (Asia Cup) चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) दोन्ही संघात किमान दोन वेळा सामना होणार आहे. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले, तर तिसऱ्यांदा देखील त्यांच्यात लढत होऊ शकते.
एशियन क्रिकेट कौन्सिलचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी शनिवारी आशिया कप 2025 चं वेळापत्रक जाहीर केलं. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून 28 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.
मोहसिन नकवी यांनी औपचारिक घोषणेत सांगितलं की,
यूएईमध्ये ACC पुरुष आशिया कप 2025 च्या तारखा निश्चित करताना मला आनंद होतो आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाईल. आम्ही या स्पर्धेत दर्जेदार क्रिकेट पाहण्याची अपेक्षा ठेवतो. संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल.
2025 आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिला सामना 14 सप्टेंबर रोजी होईल, जो लीग टप्प्यातील सामना असेल. त्यानंतर दोन्ही संघ 21 सप्टेंबर रोजी सुपर-6 टप्प्यात पुन्हा एकमेकांसमोर येतील. ACC च्या प्रसारकांसोबत झालेल्या करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे आणि सुपर-6 मध्येही त्यांच्यात दुसरी लढत निश्चित आहे. दोन्ही संघ जर अंतिम फेरीत पोहोचले, तर तिसरी लढतही होऊ शकते.
आशिया कप कुठे खेळवायचा याचा निर्णय 24 जुलै रोजी ACC च्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला ACC चे सर्व 25 सदस्य सहभागी झाले होते. या स्पर्धेचं यजमानपद BCCI कडे असलं तरी ती UAEमध्ये खेळवली जात आहे. कारण भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 2027 पर्यंत दोन्ही संघांनी फक्त ‘न्यूट्रल व्हेन्यू’वरच सामने खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
तसंच, भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर आशिया कप 2025 हा टी20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. कारण ICC च्या पुढील मोठ्या स्पर्धेनुसारच आशिया कपचा फॉरमॅट ठरवला जातो.






