आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) कोलंबो येथे खेळला जाणार आहे. भारत आणि श्रीलंका हे दोन मजबूत संघ अंतिम सामन्यात एकमेकांशी भिडतील. यंदा आशिया चषक जिंकून भारतीय संघ तब्बल आठव्यांदा ही स्पर्धा आपल्या नावे करणार की यजमान श्रीलंका भारताला पछाडत सातव्यांदा आशिया चषक जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. आतापर्यंत कोणकोणत्या संघांनी ही मानाची स्पर्धा आपल्या नावे केली आहे हे या लेखात आपण पाहूया.
भारतीय संघाने 1983 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर पुढच्या वर्ष शारजा येथे पहिला आशिया चषक खेळला गेला. अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करत स्पर्धा आपल्या नावे केली. त्यानंतर 1986 मध्ये श्रीलंकेने यजमानपद भूषवलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद जिंकले. भारतीय संघाने या स्पर्धेतून माघार घेतली होती. 1988 मध्ये पुन्हा भारत-श्रीलंका असा अंतिम सामना झाला. श्रीलंका अंतिम सामन्यात पराभूत झाली. तर, भारतीय संघाने दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली.
सन 1990-1991 मध्ये भारतात आशिया चषकाचे आयोजन केले गेले. या स्पर्धेतून पाकिस्तानने राजकीय कारणाने माघार घेतली होती. त्यावेळी पुन्हा भारताने श्रीलंकेला पराभूत करत तिसऱ्यांदा स्पर्धा आपल्या नावे केली. 1993 मध्ये स्पर्धेचे आयोजन केले गेले नाही. त्यानंतर 1995 मध्ये भारत, पाकिस्तान व श्रीलंका समान गुणांवर राहिले असताना, सरस धावगतीच्या जोरावर भारत व श्रीलंकेने अंतिम फेरीत प्रवेश केला. ज्यामध्ये भारताने श्रीलंकेवर मात करत चषक उंचावला. तर 1997 मध्ये श्रीलंकेने यजमानपद भूषवत असताना स्पर्धा देखील आपल्या नावे केली.
आशिया चषकाचे पुढील आयोजन 2000 मध्ये बांगलादेशमध्ये झालेले. येथे पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत करत पहिल्यांदाच आशिया चषक जिंकला. त्यानंतर आशिया चषकाचे आयोजन थेट चार वर्षांनी 2004 मध्ये झाले. प्रथमच सहा संघांच्या झालेल्या या स्पर्धेत श्रीलंकेने भारताला पराभूत करत तिसऱ्यांदा स्पर्धा जिंकली. तर, श्रीलंकेने त्यानंतर 2008 मध्ये देखील भारताला पराभूत करून आपले विजेतेपद राखले.
भारतीय संघाने त्यानंतर 2010 स्पर्धेचे विजेतेपद जिंकत, 15 वर्षाचा दुष्काळ संपवला. तर, 2012 मध्ये पाकिस्तानी दुसऱ्यांदा स्पर्धा आपल्या नावे केली. श्रीलंकेने 2014 मध्ये आपले पाचवे आशिया चषक विजेतेपद जिंकले.
टी20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर 2016 मध्ये प्रथमच आशिया चषक टी20 स्वरूपात खेळला गेला. यामध्ये भारतीय संघाने विजेतेपद जिंकले. 2018 मध्ये पुन्हा एकदा वनडे स्वरूपात झालेल्या आशिया चषकात भारतीय संघाने अंतिम सामन्यात बांगलादेशवर वर्चस्व गाजवत सातव्यांदा स्पर्धा जिंकली. मागील वर्षी पुन्हा एकदा टी20 स्वरूपात झालेले आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेने अनपेक्षितरित्या आपल्या नावे केली.
आतापर्यंतचे आशिया चषक विजेते:
भारत (7 वेळा)
श्रीलंका (6 वेळा)
पाकिस्तान (2 वेळा)
(Asia Cup Winner From 1984 To 2022 India Face Srilanka In Finals)
महत्वाच्या बातम्या –
रोहित-तिलकच्या निराशाजनक विकेट्स, वेगवान गोलंदाजामुळे बांगलादेशची शानदार सुरुवात
शाकिबच्या धमाक्यामुळे बांगलादेशची आव्हानात्मक धावसंख्या! भारतासाठी शार्दुल पुन्हा चमकला