ओमानमध्ये सध्या लिजेंड्स क्रिकेट लीग (legends cricket league 2022) स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केलेले खेळाडू चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसून येत आहेत. दरम्यान, सोमवारी( २४ जानेवारी ) झालेल्या सामन्यात आशिया लायन्स आणि इंडिया महाराजा (Asia lions vs India maharajas) हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात इंडिया महाराजा संघाला मोठ्या अंतराने पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या स्पर्धेत इंडिया महाराजा संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. या संघाने पहिल्याच सामन्यात आशिया लायन्स संघाविरुद्ध मोठा विजय मिळवला होता. युसूफ पठाण आणि मोहम्मद कैफ यांच्या जोडीने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. परंतु, सोमवारी झालेल्या सामन्यात इंडिया महाराजा संघाला ३६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या सामन्यात इंडिया महाराजा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, तर प्रथम फलंदाजी करताना आशिया लायन्स संघाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. संघातील सलामीवीर फलंदाज तिलकरत्ने दिलशान आणि कलुविथरणा स्वस्तात माघारी परतले होते.
पण, त्यानंतर उपुल थरांगाने ४५ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि ४ षटकारांचा साहाय्याने ७२ धावांची खेळी केली होती, तर असगर अफगाणने २८ चेंडूंमध्ये ६९ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार मारले होते. या तुफानी खेळीच्या जोरावर आशिया लायन्स संघाला २० षटक अखेर ४ बाद १९३ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. गेल्या सामन्यातील शतकवीर नमन ओझा स्वस्तात माघारी परतला होता, तर वसीम जाफरने डाव सांभाळत ३५ धावांची खेळी केली. शेवटी मनप्रीत गोनीने देखील ३५ धावांचे योगदान दिले. तसेच गेल्या सामन्यात तुफानी खेळी करणाऱ्या युसूफ पठाणला या सामन्यात अवघ्या २१ धावा करण्यात यश आले. कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी इंडिया महाराजा संघाला २० षटक अखेर ८ बाद १५७ धावा करण्यात यश आले. हा सामना आशिया लायन्स संघाने ३६ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
दणदणीत मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू म्हणतोय ‘जय श्रीराम’; वाचा संपूर्ण प्रकरण
वाढदिवस विशेष: टीम इंडियाची माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा!
हे नक्की पाहा: