भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. कित्येक नवखे क्रिकेटपटू त्याची धुव्वादार फलंदाजी शैली शिकण्याचा प्रयत्न करतात. कोहलीप्रमाणेच पाकिस्तान क्रिकेट संघाचा बाबर आझम यानेही त्याच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर क्रिकेटजगतात फार कमी काळात मोठे नाव कमावले आहे. त्यामुळे बऱ्याच आजी-माजी क्रिकेटपटूंना आझमची फलंदाजी शैली हा कोहलीसारखी भासल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता पाकिस्तानचे माजी कर्णधार जहीर अब्बास यांनी कोहली आणि आझमविषयी मोठे भाष्य केले आहे.
क्रिकेट पाकिस्तानशी झालेल्या प्रश्न-उत्तर सेशनमध्ये जहीर यांनी कोहली आणि आझम यांच्या फलंदाजीचे तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले की, “भारताचा संघनायक कोहली जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक आहे, यात कसलीही शंका नाही. त्याच्यानंतर आमचा हिरो आझमचा क्रमांक लागतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाहून एक सरस फलंदाजांचा भरणा असला तरीही मी फक्त या दोघांचीच निवड करेल. माझ्या मते कोहली आणि आझम हेच ते दोन फलंदाज आहेत, ज्यांच्या फलंदाजी शैलीचे सर्वजण अनुसरण करतात.”
आयपीएलच्या सिताऱ्यांनी कोहली-आझमचे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला
“मी आयपीएलमधील काही उभरत्या सिताऱ्यांना कोहली आणि आझमच्या फलंदाजी शैलीची कॉपी करण्याचा प्रयत्न करताना पाहिले आहे. मी आयपीएलचे काही सामने पाहिले आहेत आणि मला काही फलंदाज स्लिप आणि गलीमध्ये कट शॉट खेळताना दिसले. त्यामुळे कोहली आणि आझमचे हा खास शॉट सर्वसाधारण बनला आहे. आजकाल बरेचसे क्रिकेटपटू हा शॉट खेळताना दिसत आहेत,” असे त्यांनी पुढे म्हटले.
कोहली आणि आझम हे सध्या आयसीसीच्या वनडे, टी२० आणि कसोटी क्रमवारीत टॉप-१० मध्ये आहेत. यावरुन स्पष्ट होते की, हे दोन्ही फलंदाज मागील काही वर्षात आपल्या प्रदर्शनात सातत्य ठेवून कामगिरी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या श्रीलंका दौऱ्याचा वाढणार रोमांच, ३ नव्हे ‘इतक्या’ सामन्यांची होणार टी२० मालिका!
कसोटी चॅम्पियनशीपमध्ये अशी राहिली आहे कोहली आणि विलियम्सनची कामगिरी, पाहा कोण राहिलं आहे श्रेष्ठ






