भारतीय पुरुष क्रिकेट संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर पाच सामन्यांची टी २० मालिकाही खेळण्याचे नियोजन आहे. यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखालील संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील काही सामन्यांना भारताचे प्रमुख खेळाडू मुकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
न्यूझीलंड दौऱ्यात पाच-पाच सामन्यांची एकदिवसीय आणि टी 20 मालिका, तसेच दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मालिकांचे वेळापत्रक पाहिले तर पुढील मालिकेच्या तयारीसाठी फारच कमी वेळ आहे. अशात कसोटी आणि एकदिवसीय हे दोन्ही फॉरमॅट खेळणारे अनेक भारतीय खेळाडू शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. तसेच सध्या भारताचा टी 20 संघ जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला आहे.
गिल, जसप्रीत बुमराह, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी आणि मोहम्मद सिराज यांसारखे खेळाडू सातत्याने दोन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी आणि एकदिवसीय) खेळतात. मिळालेल्या माहितीनुसार, कसोटी मालिकेच्या तयारीसाठी यापैकी बहुतेक खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यात सहभागी होणार नाहीत.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटचा म्हणजे पाचवा एकदिवसीय सामना 15 नोव्हेंबर रोजी आहे, तर पहिला कसोटी सामना 19 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. यामुळे भारताकडे तयारीसाठी केवळ 4 दिवस आहेत. परिस्थिती पाहता शेवटच्या काही एकदिवसीय सामन्यांमध्ये गिलऐवजी श्रेयस संघाचे नेतृत्व करण्याचीही शक्यता आहे.
त्याचबरोबर भारताच्या प्रशिक्षक संघाचीही दोन गटात विभागणी करण्यात येणार आहे. संघातील मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल, सहाय्यक प्रशिक्षक सितांशु कोटक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक शुभदीप घोष यांच्यातील दोघेजण शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघासोबत थांबतील, तर उर्वरित कसोटी मालिकेच्या तयारीसाठी वेलिंग्टनला रवाना होती.
वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचे वेळापत्रक
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताच्या संघात नमन धीर आणि औकिब नबी यांचा समावेश करण्यात आला आहे. ही मालिका 27 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी 20 मालिका सुरू होणार असून शेवटचा सामना 17 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.






