भारत देशामध्ये क्रीडाक्षेत्राकडे इतर क्षेत्रांच्या तुलनेत नेहमीच दुर्लक्ष झालेले पाहायला मिळते. भारतात केवळ क्रिकेटकडे खेळ म्हणून पाहिले जाते, असा उपहासात्मक टोलादेखील अनेक जण लगावतात. याचे कारण म्हणजे इतर खेळातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा अभाव अथवा खेळानंतर आपला चरितार्थ चालवण्यासाठी योग्य ती मदत केली जात नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा पंजाबमध्ये आला. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाला सुवर्णपदके मिळवून देणाऱ्या एका युवा वेटलिफ्टरवर चक्क कुटुंब सांभाळण्यासाठी चहा विकण्याची वेळ आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गावातील आहे खेळाडू
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांचे मूळ गाव असलेल्या मेहराज येथील आशियाई सुवर्णपदक विजेता वेटलिफ्टर इंद्रजीत सिंग आपल्या वडिलांसोबत रामपुरा फुल येथे चहाचे दुकान चालवत आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलत आहे. त्याची अनेक आंतरराष्ट्रीय पदके त्याची दोन वेळची भूक भागवण्यासाठी उपयोगी पडली नाहीत. इतकेच नव्हे तर त्याला आपले घर देखील गहाण ठेवावे लागले आहे. अनेकदा सरकारी कार्यालयांचे खेटे मारूनही त्याच्या पदरी अद्याप सरकारी नोकरी पडलेली नाही.
‘अशी’ राहिली कारकीर्द
लहानपणापासून वेटलिफ्टिंगची आवड असणाऱ्या इंद्रजीतने २०११ पासूनवेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. वेटलिफ्टिंगमध्ये कारकीर्द करण्यासाठी त्याने केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतले. दोन वर्षात त्याने राज्यस्तरावरील विजेता होण्याचा मान मिळवला. राष्ट्रीय स्तरावर त्याने दोन सुवर्णपदकांची कमाई करताना दोन वेळा राष्ट्रीय विक्रम बनवला होता.
सन २०१८ मध्ये उदयपूर येथे झालेल्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत त्याने चीनच्या खेळाडूला मागे टाकत सुवर्णपदक जिंकले होते. याच वर्षी तो दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत देखील सहभागी झालेला. इंद्रजीत याचा मोठा भाऊ हरदीप हादेखील राष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टिंग खेळाडू राहिला आहे. मात्र, हलाखीच्या परिस्थितीमुळे तो आपली कारकीर्द आणखी पुढे येऊ शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
नवीन संघ, नवीन कर्णधार आणि नवीन खेळाडू! ‘या’ कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरेल श्रीलंका दौरा
भारतीय संघातील ‘या’ खेळाडूच्या जीवावर युवराज सिंग आपल्या प्राणाची बाजी लावण्यास तयार
WTC Final: रिषभ पंतच्या ‘त्या’ बेजबाबदार फटक्यावर दिग्गज खेळाडूने दिली प्रतिक्रिया






