आशियाई कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करत अनिल आणि ज्योतीने भारतासाठी दोन कांस्यपदकाची कमाई केली. तर रितू आणि दीपक हे कांस्यपदक जिंकण्यात अपयशी ठरले.
अनिलने पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत सहभाग घेतला आणि दमदार खेळाचे प्रदर्शन प्रेक्षकांना घडवले. ग्रीको – रोमन विभागातील ८६ किलो वजनी गटात उजबेकिस्तानच्या मुहम्मदअली शाम्सीद्दीनोव्हवर ७-६ ने विजय मिळवला. १-६ च्या पिछाडी वरून कौशल्यपूर्ण तांत्रिक खेळी करत जोरदार मुसंडी मारली आणि ७-६ ने विजयश्री खेचून आणली.
ज्योतीने महिलांच्या ७५ किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले. उपांत्य फेरीत जपानच्या मसाको फुरुईचीने १०-० ने पराभूत केले. त्यामुळे ती रेपियाज फेरीत गेली, तिच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी नसल्याने ज्योतीला कांस्य पदक निश्चित झाले. महिलांच्या ६३ किलो वजनी गटात रितू ला उत्तम कामगिरी करून देखील पराभवाला सामोरे जावे लागले. तर ग्रीको रोमन विभागातील भारताच्या दिपकला दुसऱ्या सामन्यात कांस्यपदकाच्या लढतीत किर्गिस्थानच्या नुर्गझी ऑसानगुलोव्हने पराभूत केले.
“केवळ पिछाडीवरून मुसंडी मारायची होती. आणि ती प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मी त्यात यशस्वी ठरलो. मी सामन्याचे चित्रच बदलून टाकले. पहिल्यांदाच सहभाग घेतला आणि देशाला पदक मिळवून दिल्याचा अभिमान वाटतो आहे.”- अनिल कुमार