पुणे (दि. 12 एप्रिल) : अपराजित अॅस्पायर एफसी संघाने कमालीचे सातत्य राखताना नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स आयोजित इन्फिनिटी टू के ट्वेन्टी फोर नाईन-ए-साइड महिला फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात विजेतेपद पटकावले. नेस वाडिया कॉलेजच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत एकूण 17 गोल करताना त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले.
ऑनवर्ड टेक्नॉलॉजिस पुरस्कृत अॅस्पायर एफसीने अंतिम फेरीत दिएगो ज्युनियर एफसीए संघावर 4-1 असा सहज विजय मिळवला. रितिका सिंग आणि पूजा गुप्ताने प्रत्येकी दोन गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रतिस्पर्धी टीमकडून एकमेव गोल श्वेता मलंगवे हिने केला. ( Aspire FC won the Nine-A-Side Womens Football Championship )
अॅस्पायर एफसीने संपूर्ण स्पर्धा गाजवली. स्पर्धेत अपराजित राहताना 5 सामन्यांत 17 गोल केले आणि केवळ एक गोल स्वीकारला. अॅस्पायर एफसीच्या सांघिक विजयात त्यांच्या सहा खेळाडूंचा मोठा वाटा राहिला. अॅस्पायर एफसीने डिएगो ज्युनियर्स एफसीएला1-0 असे हरवत विजयी सलामी दिली. त्यात समृद्धी काटकोळेचा एकमेव गोल निर्णायक ठरला. गो स्पोर्ट्सकडून पुढे चाल (वॉकओव्हर) मिळण्यापूर्वी, दुसर्या फेरीत त्यांनी अशोका एफसीचा 9-0 असा धुव्वा उडवला.
अनुष्का पवारची गोल हॅट्ट्रिक तसेच समृद्धीसह अन्वी पाठक आणि जिग्मेट चुनझेनच्या प्रत्येकी दोन गोलमुळे त्यांनी मोठा विजय साकारला. उपांत्य फेरीत अॅस्पायर एफसीने उत्कर्ष क्रीडा मंच ‘ए’ संघावर 3-0 अशी मात केली. इन्फिनिटी टू के ट्वेन्टी फोर नाईन-ए-साईड महिला फुटबॉल स्पर्धेतील सामने मध्यंतरासह प्रत्येकी 20 मिनिटांचे खेळले गेले. ही स्पर्धा सर्व क्लबसाठी खुली होती.