पॅरिस येथील डायमंड लीग स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेनं 8 मिनिटं 9.91 सेकंद वेळ नोंदवत सहावं स्थान पटकावलं. अशा प्रकारे त्यानं 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. अविनाश साबळेनं 2022 मध्ये 8 मिनिटं 11.20 सेकंदांची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला होता. येत्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी अविनाश साबळेचा हा फार्म भारतासाठी चांगलं लक्षण आहे.
केनियाच्या आमोस सेरेम (8:02.36) आणि इथिओपियाच्या अब्राहम सिमनं (8:02.36) समान वेळ नोंदवली. मात्र ‘फोटो फिनिश’मध्ये केनियाचा खेळाडू अव्वल राहिला. केनियाच्याच अब्राहम किबिवोटेनं 8:06.70 च्या वेळेसह तिसरं स्थान पटकावले. अविनाश साबळेनं बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये रौप्य पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम केला होता.
भालाफेक स्पर्धेत ऑलिम्पिक संघाचा सदस्य किशोर जेना याची कामगिरी चांगली झाली नाही. तो 78.10 मीटरच्या थ्रो सह आठव्या स्थानावर राहिला. किशोर जेनाचा सर्वोत्तम थ्रो 87.54 मीटर आहे. तर या हंगामातील त्याची सर्वोत्तम कामगिरी 80.84 मीटर आहे. किशोर जेनानं गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होतं. किशोर जेनानं दोहा डायमंड लीगमध्ये 76.31 मीटर आणि फेडरेशन कपमध्ये 75.49 मीटर थ्रो केला होता.
सध्याचा ऑलिम्पिक आणि जगज्जेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं मांडीच्या समस्येमुळे या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नीरज आता थेट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपली जादू दाखवणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला फिटनेसबाबत कोणताही धोका पत्करायचा नव्हता, हे या मागचं कारण आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“महाराष्ट्र सरकारसाठी सर्व खेळ समान नाहीत”, स्टार बॅडमिंटनपटूचा गंभीर आरोप
एक शर्मा गेला, दुसरा शर्मा आला! झिम्बाब्वेविरुद्ध युवराजच्या शिष्याचा कहर
टी20 विश्वचषक फायनलनं अवघ्या 24 तासात मोडले सर्व रेकॉर्ड! आयसीसीनं जाहीर केली आकडेवारी