गोवा| एटीके मोहन बागान १५ दिवसांनंतर इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. त्यांच्या मागील दोन लढती स्थगित झाल्या होत्या. पुनरागमनाच्या लढतीत त्यांच्यासमोर गुरुवारी टेबल टॉपर केरला ब्लास्टर्स एफसीचे आव्हान आहे. येथील टिळक मैदान स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.
एटीके मोहन बागाननं आतापर्यंत ९ सामन्यांत १५ गुणांची कमाई करताना ६वे स्थान पटकावले आहे. केरला ब्लास्टर्सविरुद्ध विजय मिळवण्यात यशस्वी झाल्यास मोहन बागान अव्वल चार संघांमध्ये एन्ट्री मारतील. पण, हे तितकं सोपं नक्की नसेल. इव्हान व्हुकोमानोव्हिच यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या केरला ब्लास्टर्सचे आक्रमण हे प्रमुख अस्त्र आहे आणि मागील १० सामन्यांत त्यांनी एकही पराभव पत्करलेला नाही. एड्रीयन लुनानं ११ सामन्यात केरला ब्लास्टर्ससाठी ६ असिस्ट ( गोल करण्यात मदत) केले आहेत आणि तो अहमद जाहौह व ग्रेग स्टीव्हर्ट यांच्यासह या विक्रमात संयुक्तपणे अव्वल स्थानी आहे. आयएसएलमधील त्याचे हे पहिलेच वर्ष असले तरी तो मोठ्या विक्रमाच्या दिशेनं कूच करत आहे.
केरलाकडे प्रभसुखन गिल हा भरवशाचा गोलरक्षक आहे आणि त्याची बचावभींत ओलांडणे भल्याभल्या आक्रमणपटूंना जमलेलं नाही. आतापर्यंत या पर्वात त्यानं ८ सामन्यांपैकी चारमध्ये प्रतिस्पर्धींना गोल करू दिलेला नाही. अन्य संघांच्या गोलरक्षकांना दोनपेक्षा अधिक सामन्यांत अशी कामगिरी करता आलेली नाही.
दुसरीकडे संदेश झिंगनच्या कमबॅकनं एटीके मोहन बागानची बचावफळी मजबूत झालेली नाही. मागच्यावेळेस जेव्हा उभय संघ समोरासमोर आले होते, तेव्हा मोहन बागाननं ४-२ असा दणदणीत विजय मिळवला होता. त्यावेळी अँटोनियो लोपेझ हबास हे मोहन बागानचे प्रशिक्षक होते. आता ही जबाबदारी ज्युआन फेरांडो यांच्याकडे आहे. ते म्हणाले,”सत्राच्या सुरुवातीचा सामना आणि उद्या होणारा सामना, हा पूर्णपणे वेगळा असेल. मी तेव्हा या संघासोबत नव्हतो. त्यामुळे सध्याचा केरला संघाचा जो फॉर्म आहे, त्यावर माझं लक्ष आहे आणि त्यानुसार आम्ही सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंनी संघाला मदत करण्यासाठी तयार असायला हवं.”
मागील ९ सामन्यांत मोहन बागानविरुद्ध प्रतिस्पर्धींनी १८ गोल केले आहेत आणि फेरांडो यांना हिच गोष्ट चिंतीत करणारी आहे. मागील सातपैकी एकाही सामन्यांत त्यांना क्लिन शीट ठेवता आलेली नाही. ह्युगो बौमोस याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही. ह्युगो हा मोहन बागानच्या आक्रमणाचा कणा आहे. ९ सामन्यांत त्यानं पाच गोल केले आहेत, तर तीन गोलसाठी मदत केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ICC टी२० ‘टीम ऑफ दी ईयर’ जाहीर! यादी पाहून टीम इंडियाचे चाहते खवळले; एक पण भारतीय कसा नाही?
केएल राहुलच्या हाती वनडे संघाची सुत्रे येताच ३८ वर्षांनंतर पुन्हा घडला इतिहास, वाचा सविस्तर
क्या बात!! भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडेत पंचांनी झळकावलय खास शतक, वाचा सविस्तर
हेही पाहा-