गोवा – इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) आजच्या सामन्यात एटीके मोहन बागानच्या संघाने वर्चस्व गाजवले. मोहन बागानने २-० अशा फरकाने एफसी गोवाचा पराभव करून सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. मनवीर सिंग आजच्या सामन्यातील नायक ठरला. त्याने तिसऱ्या व ४६व्या मिनिटाला असे दोन गोल केले. दुसऱ्या हाफमध्ये मोहन बागानचे आणखी गोल झाले असते, परंतु अंतिम क्षणाला त्यांना अपयश आले. अन्यथा या सामन्यात मोहन बागानचा आणखी मोठा विजय पक्का होता. या विजयासह मोहन बागानच्या खात्यात २९ गुण झाले आहेत, परंतु एफसी गोवाचा पुढील मार्ग आणखी खडतर झाला आहे.
मोहन बागानने मंगळवारी एफसी गोवाविरुद्ध दणक्यात सुरूवात केली. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला मोहन बागानला कॉर्नर मिळाला आणि लिस्टन कोलासोच्या क्रॉसवर मनवीर सिंगने हेडरद्वारे ‘बुलेट’ गोल केला. चेंडूचा वेग इतका होता की गोवाचा गोलरक्षक धीरज मोइंरंगथेमला अडवता आला नाही. या गोल नंतरही कोलासो व मनवीर यांनी गोवाच्या बचावफळी वर सातत्याने दबाव वाढवण्याचा खेळ सुरूच ठेवला. ११व्या मिनिटाला कोलासोनं गोवाच्या खेळाडूंना चांगलेच दमवले होते, परंतु थोड्याशा फरकाने तो गोल करू शकला नाही.
१६व्या मिनिटाला जॉर्ज ऑर्टिझ बरोबरीचा गोल करण्याच्या अगदी जवळ गेला होता, परंतु मोहन बागानच्या बचावपटूंनी त्याला चांगले टॅकल केले. पण, त्याच्या या प्रयत्नानंतर गोवाचा खेळ उंचावत गेला. त्यांनी लहानलहान पास देत आक्रमण तीव्र केले. ३०व्या मिनिटाला मनवीर पुन्हा गोल करण्यासाठी चेंडू एकट्याने घेऊन ६ यार्ड बॉक्सपर्यंत पोहोचला होता, परंतु अखेरच्या क्षणाला इव्हान गोंझालेजने सुरेख बचाव केला. ३४ व्या मिनिटाला गोवाकडून पलटवार झालाच… अन्वर अलीने दूरून मारलेल्या चेंडूने मोहन बागानचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याला चकवलेच होते, परंतु चेंडू क्रॉस बारवर आदळला. गोवा संघाच्या खेळाडूंना काही वेळ विश्वासच बसला नाही. पहिल्या सत्रात मोहन बागानने १-० अशी आघाडी कायम राखली.
मध्यंतराच्या पहिल्याच मिनिटाला गोवाच्या खेळाडूंच्या एका चूकीचा मनवीरने फायदा उचलला आणि ४६व्या मिनिटाला मोहन बागानसाठी दुसरा गोल केला. ५०व्या मिनिटाला मनवीर पुन्हा चेंडू ६ यार्डात घेऊन गेला होता, परंतु यावेळेस गोवा संघाचा गोलरक्षक धीरजने त्याला रोखले. ५३व्या मिनिटाला असाच एक प्रयत्न फसला अन्यथा मोहन बागानने गोलखात्यात आणखी एक भर घातली असती. ६१व्या मिनिटाला मनवीर पुन्हा एकदा ६ यार्डातील बॉक्समध्ये चेंडू घेऊन गेला, परंतु इव्हान गोंझालेजने सुरेख टॅकल करताना संघासाठी गोल वाचवला. मोहन बागानच्या खेळाडूंकडून पेनल्टीची अपील झाली, परंतु अम्पायरने ती नाकारली. गोवा संघाचे खेळाडू एव्हाना खचलेले दिसू लागले होते. पण, मोहन बागानलाही वारंवार प्रयत्न करूनही आणखी गोल करता आले नाही. पण, त्यांनी २-० असा विजय निश्चित केला.
निकाल – एटीके मोहन बागान २ ( मनवीर सिंग ३ मि. व ४६ मि. ) विजयी विरूद्ध एफसी गोवा ०.
महत्त्वाच्या बातम्या-
मूर्ती लहान पण कीर्ती महान! आयपीएल २०२२ चे ५ सर्वात युवा धुरंधर, विश्वविजेत्या कर्णधाराचा समावेश
पटणा पायरेट्सची विजयी घोडदौड सुरूच, बंगळुरू बुल्सला २ गुणांच्या फरकाने केले चितपट
आता महिला क्रिकेटपटूंवरही बरसणार पैसा; वाचा सविस्तर