कोलकाता, २९ ऑक्टोबर : कोलकाताचे विवेकानंद युवा भारती क्रीडांगण शनिवारी एटीके मोहन बागान विरुद्ध ईस्ट बंगाल एफसी या ऐतिहासिक सामन्याचा साक्षीदार बनला. दोन्ही संघांचा एकमेकांविरुद्धचा फार जुना इतिहास आहे आणि त्यामुळेच हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) मधील हा सामना पाहण्यासाठी ६२,५४२ प्रेक्षक उपस्थित होते. पहिल्या हाफमधील कडव्या टक्करमुळे गोलशून्य बरोबरी राहिली आणि त्यामुळे दुसऱ्या हाफची उत्सुकता शिगेला पोहोचली. मध्यंतरानंतर जबरदस्त थरार अनुभवायला मिळाला. मोहन बागानने उल्लेखनीय खेळ करताना १० मिनिटाच्या अंतराने दोन गोल केले. ह्युगो बौमोस ( ५६ मि.) व मनवीर सिंग (६६ मि. ) यांच्या गोलने मोहन बागानचा विजय पक्का केला. या निकालासह मोहन बागान चौथ्या स्थानी आले.
पाचव्या मिनिटाला एटीके मोहन बागानने (ATK Mohun Bagan FC) हल्लाबोल केला आणि सुभाशीष बोसने ८ यार्डावरून मारलेल्या चेंडूने गोलरक्षक यालाही चकवले होते, परंतु चेंडू गोलपोस्टच्या बाजूने मैदानाबाहेर गेला. ईस्ट बंगालने (East Bengal FC) ९व्या मिनिटाला थाँगखोसिएम हाओकिपने व्हॉलीद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूशी तो योग्य कनेक्ट करू शकला नाही. १६व्या मिनिटाला नाओरेम सिंगच्या क्रॉसवर ६ यार्ड बॉक्सवरून हाओकीपने हेदरद्वारे चेंडू गोलजाळीच्या दिशेने टोलावला, परंतु मोहन बागानचा गोलरक्षक विशाल कैथला तो रोखण्यात यश आले अन् समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला. सुरुवातील संथ वाटणारा ईस्ट बंगालचा खेळ बहरताना दिसला आणि त्यांच्याकडून वारंवार प्रयत्न होत राहिले. २०व्या मिनिटाला जॉर्डन ओ’डोहर्टी चेंडू घेऊन पेनल्टी क्षेत्रात शिरला होता, पण मोहन बागानच्या बचावपटूंनी त्याला यश मिळू दिले नाही.
३२व्या मिनिटाला सार्थक गोगोईने अप्रतिम बचाव करताना मोहन बागानला आघाडी घेण्यापासून रोखले. ह्युगो बौमोसने ६ यार्ड बॉक्समधून हा गोल करण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही कट्टर स्पर्धकांमध्ये मैदानावरील वातावरण काही काळ तापलेही होते आणि खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावले. रेफरीने मध्यस्थी करताना हा वाद मिटवला. लिस्टन कोलासोने मोहन बागानने दमदार खेळ केला. पहिल्या हाफमधील गोलशून्य बरोबरीनंतर मध्यंतरानंतरचा खेळ कसा होतो याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मोहन बागान व ईस्ट बंगाल यांच्यातील हिरो आयएसएलमध्ये झालेल्या चार लढतींत १३ गोल्स झाले होते आणि त्यामुळे आजच्या सामन्यातही गोल्सचा पाऊस अपेक्षित होता.
मध्यंतराला मोहन बागानने पहिल्या १० मिनिटांत दमदार खेळ केला आणि त्याचे फळ त्यांना मिळाले. ह्युगो बौमोसने ५६व्या मिनिटाला दीपक टांग्रीच्या पासवर २५ यार्डवरून थेट हल्ला चढवला, यावेळेस कमलजित सिंगला तो रोखता आला नाही. मोहन बागानने १-० आघाडी घेतल्यानंतर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. ईस्ट बंगालच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. आयएसएल २०२१-२२ नंतर सामन्यात आघाडी घेतल्यानंतर मोहन बागानने १४ पैकी केवळ २ लढती गमावल्या होत्या आणि ही आकडेवारी ईस्ट बंगालच्या चिंतेत भर घालणारी होती. ६३व्या मनिटाला लिस्टन कोलासोने सुरेख चेंडू पास केला अन् ह्युगोची एक टच मोहन बागानची आघाडी दुप्पट करणारी ठरली असती. पण, यावेळेस ह्युगोला अपयश आले.
६६व्या मिनिटाला मनवीर सिंगने मोहन बागानची आघाडी दुप्पट केली आणि प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांना आनंद गगनात मावेनासा झाला. ७१व्या मिनिटाला ईस्ट बंगाल पहिला गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते, परंतु लेनी रॉड्रिगेसने चतुराईने बचाव केला. आता ईस्ट बंगालकडून पराभव टाळण्याचा प्रयत्न सुरू झाला, परंतु मोहन बागानचा बचाव तितकात सतर्क होता. मोहन बागानला ही कोलकाता डर्बी जिंकण्यापासून ईस्ट बंगालला रोखता आले नाही. ४ मिनिटांच्या भरपाई वेळेतही मोहन बागानने वर्चस्व राखले. मोहन बागानकडून ५ ऑन टार्गेट व ६ ऑफ टार्गेट प्रयत्न झाले, तुलनेले ईस्ट बंगालकडून अनुक्रमे ३ व ३ एवढीच संधी मिळाली. गोलरक्षक विशाल कैथ यालाही विजयाचे श्रेय द्यायला हवे.
निकाल : एटीके मोहन बागान २ ( ह्युगो बौमोस ५६ मि., मनवीर सिंग ६६ मि. ) विजयी वि. ईस्ट बंगाल एफसी ०.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी: यु मुंबाचा डिफेन्सच्या जोरावर दमदार विजय; दिल्लीची सलग तिसरी हार
वेंगसरकरांच्या खांद्यावर बीसीसीआयमध्ये मोठी जबाबदारी; तर प्रज्ञान ओझा बनला…






