आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. परंतु भारतीय संघ तेथे सहभागी होण्यासाठी जाणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध चांगले नाहीत. अशा परिस्थितीत या प्रकरणाचा अंतिम निर्णय केंद्र सरकारवर अवलंबून आहे.
भारतीय संघानं 2008 पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. यापूर्वीही पाकिस्तानमध्येही अनेक प्रसंगी भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेत मोठ्या त्रुटी पाहायला मिळाल्या आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआयही कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. या बातमीद्वारे जाणून घेऊया, पाकिस्तानमध्ये भारतीय खेळाडूंवर केव्हा-केव्हा हल्ला झाला होता.
पाकिस्तानमध्ये भारतीय क्रिकेटपटूंवर पहिला हल्ला 1989-90 मध्ये झाला होता. या दौऱ्यादरम्यान एका धार्मिक संघटनेशी संबंधित व्यक्तीनं के. श्रीकांतला धक्काबुक्की केली होती. संजय मांजरेकर यांनीही त्यांच्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला असून या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी समर्थकानं श्रीकांतची जर्सीही फाडल्याचं सांगितलं आहे. याच सामन्यात श्रीकांतशिवाय मोहम्मद अझरुद्दीनलाही लक्ष्य करण्यात आलं होतं. त्या दौऱ्यावर टीम इंडियाचे मॅनेजर म्हणून काम केलेल्या चंदू बोर्डे यांनी अझरुद्दीनला लोखंडी वस्तूनं मारल्याचा खुलासा केला होता. सुदैवान त्याला गंभीर दुखापत झाली नाही.
1997 च्या पाकिस्तान दौऱ्यातही भारतीय खेळाडूंना अशाच प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर वनडे मालिकेदरम्यान टीम इंडियाच्या 4 खेळाडूंवर दगडफेक करण्यात आली. सौरव गांगुली, नीलेश कुलकर्णी, आबे कुरुविला आणि देबाशीष मोहंती हे ते चार खेळाडू होते. या दौऱ्यावर सचिन तेंडुलकर भारतीय संघाचा कर्णधार होता. या घटनेनंतर त्यानं सुरक्षेचे कारण देऊन मैदानावर येण्यास नकार दिला होता. यानंतर 2006 मध्येही पाकिस्तानी चाहत्यांनी सचिन तेंडुलकरला लक्ष्य केलं होतं. या दौऱ्यावरील कराची कसोटीदरम्यान पाकिस्तानी समर्थकांनी सचिन तेंडुलकरवर दगडफेक केली होती.
इरफान पठाणलाही 2006 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर अशाच एका घटनेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानं स्वतः सांगितलं होतं की, या दौऱ्यात तो एका सामन्यात मिड-विकेटवर क्षेत्ररक्षण करत असताना कोणीतरी त्याच्यावर धातूच्या वस्तूनं हल्ला केला होता. या घटनेनंतर सामना काही काळ थांबवावा लागला. इराफन पठाणवर झालेल्या हल्ल्यानंतर पुढच्याच सामन्यात अजित आगरकरवर छोट्या वस्तूनं हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी तो थर्ड मॅनवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यानंतरही खेळ थांबवावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
5 स्टार भारतीय खेळाडू, जे 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकू शकतात
जेव्हा जेम्स अँडरसननं बॉक्सिंगमध्ये हात आजमावला! ॲशेस मालिकेपूर्वी झाला होता घोळ
असा गोलंदाज पुन्हा होणे नाही! जेम्स अँडरसनचे क्रिकेटमधील असे रेकॉर्ड, जे कोणालाही मोडता येणे अशक्य