भारताचा गोल्डन बाॅय नीरज चोप्राने यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. भारतासाठी रौप्यपदक जिंकणारा तो एकमेव खेळाडू ठरला. याशिवाय इतर भारतीय खेळाडूंनी 5 कांस्यपदके जिंकली होती. तर आता पॅरिस ऑलिम्पिक 11 ऑगस्ट रोजी संपले आहे. यानंतर 13 ऑगस्टला नीरज इतर भारतीय खेळाडूंसह भारतात परतणार होता, मात्र मायदेशी परतण्याऐवजी नीरज पॅरिसहून थेट जर्मनीला रवाना झाला. पण नीरजला अचानक जर्मनीला का जावं लागलं? चला तर या बातमीद्वारे जाणून घेऊया.
वास्तविक नीरजला वैद्यकीय सल्ल्यासाठी जर्मनीला जावे लागले आहे. नीरज चोप्राला हर्नियाचा त्रास आहे, त्यामुळे त्याला जर्मनीला जावे लागले आहे. नीरज चोप्राचे काका भीम चोप्रा यांनी ‘आज तक’शी बोलताना नीरजच्या जर्मनीला जाणे आणि वैद्यकीय सल्ल्याबद्दल खुलासा केला आहे. भारतीय स्टारच्या काकांनी सांगितले की, नीरज उपचारासाठी थेट पॅरिसहून जर्मनीला गेला आहे. ते पुढे म्हणाले की, गरज पडल्यास नीरजवर शस्त्रक्रियाही करण्यात येईल. तो जवळपास महिनाभर जर्मनीत राहणार आहे.
रौप्य पदक जिंकल्यानंतर, नीरज चोप्राने स्वत: उघड केले होते की मांडीच्या समस्येमुळे तो फार कमी स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकला. यावेळी त्याने शस्त्रक्रियेबद्दलही सांगितले. पदक जिंकल्यानंतर नीरज म्हणाला, “मी माझ्या संघाशी बोलून त्यानुसार निर्णय घेईन. माझ्या शरीराची सध्याची स्थिती चांगली असली तरी मला आणखी सराव करायचे आहे. माझ्या आत खूप काही आहे आणि त्यासाठी मला स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे लागेल”.
नीरज चोप्राला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते, हे विशेष. यापूर्वी नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. पॅरिसमध्ये नीरजने 89.45 मीटर फेक करून रौप्य, तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले.
हेही वाचा-
लग्नाविना दुसऱ्यांदा वडील बनणार स्टुअर्ट ब्रॉड, गोंडस फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘या’ भारतीय खेळाडूचा कटू शकतो पत्ता
पूरनने दाखवली ‘वेस्ट इंडिज पॉवर’! मारला 113 मीटरचा लांबलचक षटकार, चेंडू नंतर सापडलाच नाही