---Advertisement---

अखेरपर्यंत रंगला ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सराव सामना; कांगारूंचा नाट्यमय विजय

On: मंगळवार, ऑक्टोबर 19, 2021 1:12 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषकाच्या मुख्य फेरीला सुरुवात होण्याआधी सर्व संघ सराव सामन्यांमध्ये भाग घेत आहेत. अबूधाबी येथील टॉलरन्स ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान सराव सामना खेळला गेला. अखेरच्या षटकापर्यंत ताणल्या गेलेल्या या रोमांचक सामन्‍यात ऑस्ट्रेलियाने एक चेंडू व तीन गडी राखून विजय मिळवला. मात्र, प्रमुख फलंदाज डेव्हिड वॉर्नर याचे अपयश या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी मोठा धडा असेल.

न्यूझीलंडची सन्मानजनक धावसंख्या
फिरकी काहीशी मदतगार असणाऱ्या या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, मार्टिन गप्टिल व डेरिल मिचेल या जोडीने तो निर्णय चुकीचा ठरवला. दोघांनीही पहिल्या गड्यासाठी ५ षटकात ४४ धावा जोडल्या. गप्टिल ३० धावा काढून माघारी परतल्यानंतर मिचेल हा ३३ धावा बनवून रिटायर्ड हर्ट झाला. कर्णधार केन विलियम्सनने ३० चेंडूत ३७ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडची मधली फळी अपयशी ठरल्याने त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अष्टपैलू जिमी निशामने १८ चेंडूत ३१ धावा काढून न्यूझीलंडला १५८ पर्यंत मजल मारून दिली. वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक तीन बळी मिळवले.

अंतिम षटकापर्यंत रंगला सामना
प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. डेव्हिड वॉर्नर खातेही न खोलता पहिल्या चेंडूवर बाद झाला. कर्णधार ऍरॉन फिंच व मिचेल मार्श हे प्रत्येकी २४ धावा काढून तंबूत परतले. स्टीव स्मिथ (३५) व मार्कस स्टॉयनिस (२८) ऑस्ट्रेलियाला विजयाच्या दिशेने घेऊन जात होते. मात्र, हे दोघेही बाद झाल्यानंतर सामन्यात रंगत निर्माण झाली. ऍश्टन एगरने २३ धावा करत सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकवलेला. परंतु, शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला तेव्हा संघाला विजयासाठी ३ चेंडूंवर ८ धावांची आवश्यकता होती. फलंदाजीला आलेला वेगवान गोलंदाज जोश इंग्लिस याने सलग दोन चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा सराव सामना २० ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध होईल. त्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषक मोहिमेला सुरुवात करतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---