सिडनी। आज(25 नोव्हेंबर) भारताने आॅस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यामुळे 3 सामन्यांची टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे.
भारताच्या या विजयात विराट कोहलीने नाबाद अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला आहे. आॅस्ट्रेलियाने या सामन्यात भारतासमोर 165 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने 19.4 षटकातच पार केले.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी 67 धावांची सलामी भागीदारीही रचली. पण जोडी तोडण्यात 2 वर्षांनी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पुनरागमन करणाऱ्या मिशेल स्टार्कला यश आले.
त्याने सहाव्या षटकात 41 धावांवर खेळणाऱ्या धवनला पायचीत बाद केले. त्याच्या पुढच्याच षटकात अॅडम झम्पाने रोहितलला 23 धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला.
त्यानंतर मात्र कर्णधार विराट कोहलीने केएल राहुलच्या साथीने भारताचा डाव सांभाळला. पण राहुलही 14 धावा करुन बाद झाला. त्याला ग्लेन मॅक्सवेलने बाद केले. त्याच्या पाठोपाठ अँड्र्यू टायने रिषभ पंतला बाद करत भारतासमोर अडचणी निर्माण केल्या. पंतला भोपळाही फोडता आला नाही.
त्यानंतर मात्र दिनेश कार्तिकने विराटला भक्कम साथ दिली. या दोघांनीही नंतर आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. त्यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद धावांची भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला.
विराटने 41 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. तसेच कार्तिकने 1षटकार आणि 1 चौकारासह 18 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या.
तत्पूर्वी आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 164 धावा केल्या होत्या. आॅस्ट्रेलियाकडून अॅरॉन फिंच(28) आणि डॉर्सी शॉर्टने(33) चांगली सुरुवात केली होती. त्यांनी सलामीला 68 धावांची भागीदारीही रचली होती. परंतू हे दोघे बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांनीही खास काही केले नाही.
अन्य फलंदाजांपैकी ग्लेन मॅक्सवेल(13), एलेक्स कॅरे(27), ख्रिस लिन(13), मार्कस स्टॉयनीस(25*) आणि नॅथन कुल्टर नाईल(13*) यांनी धावा केल्या.
भारताकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक 36 धावांत 4 विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने 19 धावांत 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या:
–हिटमॅन रोहित शर्मा आता या दिग्गजांमध्ये सामील
–कृणाल पंड्या आॅस्ट्रेलियात चमकला, केले हे खास विक्रम
–महिला टी20 विश्वचषक: आॅस्ट्रेलियाच्या महिलांनी कोरले चौथ्यांदा टी20 विश्वचषकावर नाव
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’





