---Advertisement---

IND vs AUS : भारतीय गोलंदाजांनी प्रतिष्ठा राखली! भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३ धावांनी विजय

On: बुधवार, डिसेंबर 2, 2020 5:01 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ५ बाद ३०२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला ५० षटकात विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला ४९.२ षटकात बाद २८९ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना १३ धावांनी जिंकला.

मात्र या वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्याने ही वनडे मालिका भारताने २-१ अशा फरकाने गमावली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या फलंदाजांनी लवकर विकेट्स गमावल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याने षटकारांचा वर्षाव करताना ३३ चेंडूत ४४ व्या षटकात या मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याला ऍश्टन एगरने चांगली साथ दिली होती. मात्र ४५ व्या षटकात बुमराहने त्याला ५९ धावांवर त्रिफळाचीत करत भारताच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला.

यानंतर शार्दुल ठाकूरने ४७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सीन ऍबॉटला बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर नटराजनने एगरला कुलदीप यादवकरवी झेलबाद केले. ऍबॉट ४ आणि एगर २८ धावा करुन बाद झाला. यानंतर शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराहने ऍडम झम्पाला बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव २८९ धावांवर संपवला.

भारताकडून शानदार गोलंदाजी करताना मुंबईकर शार्दुल ठाकूरने १० षटके गोलंदाजी करताना ५१ धावा दिल्या आणि सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्या व्यतिरिक्त पदार्पण करणाऱ्या नटराजनने २ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह २ तसेच कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट घेतली.

भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी

या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रलियच्या वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या आहेत. पहिल्या ४ विकेट्स २८ षटकांच्या आत गेल्यानंतर ग्रीन आणि कॅरेने डाव पुढे नेला. मात्र ग्रीनला कुलदीप यादवने जडेजाकरवी झेलबाद केले. तो ३१ व्या षटकात २१ धावा करुन बाद झाला.

यानंतर मात्र ग्लेन मॅक्सवेल आणि ऍलेक्स कॅरेने ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळताना ६ व्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. पण त्याचवेळी ३८ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चोरटी एकेरी धाव घेण्याच्या नादात त्या दोघांमध्ये गोंधळ झाला. त्यामुळे विराट कोहली आणि केएल राहुलने मिळून कॅरेला बाद धावबाद केले. कॅरे ३८ धावांवर बाद झाला.

त्यामुळे आता मॅक्सवेलला साथ देण्यासाठी ऍश्टन एगार आला आहे. तसेच मॅक्सवेलने ३५ धावांचा टप्पा पार केला आहे.

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ६० चेंडूत ७६ धावांची गरज आहे.

फिंचचे अर्धशतक

ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरच्या ऐवजी सलामीला फलंदाजीला आलेला मार्नस लॅब्यूशाने ६ व्या षटकात ७ धावांवर बाद झाल्यानंतर स्टिव्ह स्मिथही १२ व्या षटकात ७ धावावरच बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आवस्था २ बाद ५६ धावा अशी झाली.

पण यानंतर ऍरॉन फिंचला मोझेस हेन्रीक्सने चांगली साथ दिली. त्यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. पण ही भागीदारी रंगत असतानाच हेन्रीक्सला २२ धावांवर शार्दुल ठाकूरने बाद केले. तो २३ व्या षटकात बाद झाला. त्याच्या पाठोपाठ ऍरॉन फिंच ७५ धावांवर असताना २६ व्या षटकात बाद झाला. त्याला रवींद्र जडेजाने बाद करत ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. फिंचने ८२ चेंडूत ही खेळी करताना ७ चौकार आणि ३ षटकार मारले.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आवस्था २८ षटकात ४ बाद १३९ धावा अशी झाली. त्यांना १३२ चेंडूत १६४ धावांची गरज आहे. सध्या पदार्पण करणारा कॅमेरॉन ग्रीन आणि ऍलेक्स कॅरी फलंदाजी करत आहेत.

नटराजनला मिळाली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट –

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्यूशेन आणि ऍरॉन फिंच हे दोघे सलामीला फलंदाजी करायला आले. या दोघांनी चांगली सुरुवात केली. फिंचने काही आक्रमक फटके खेळले. मात्र लॅब्यूशेन संयमी खेळ करत होता.

अखेर ६ व्या षटकात वनडे पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने लॅब्यूशानेला त्रिफळाचीत करत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. लॅब्यूशानेने १३ चेंडूत ७ धावा केल्या. तो बाद झाल्यावर स्टिव्ह स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

ऑस्ट्रेलियाने ६ षटकात १ बाद २५ धावा केल्या असून यात फिंचच्या १८ चेंडूत १८ धावांचे योगदान आहे.

हार्दिक पंड्या – रवींद्र जडेजाची दीडशतकी भागीदारी –

भारताच्या मधल्या फळीला मोठ्या धावा करण्यात अपयश आल्यानंतर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाने संघाच्या फलंदाजीची जबाबदारी खांद्यावर घेतली. या दोघांनी एकेरी, दुहेरी धावांवर भर देताना काही आक्रमक फटकेही खेळले.

पंड्याने ४४ व्या षटकात ५६ चेंडूत त्याचे या वनडे मालितेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने अनेक आक्रमक फटकेबाजी केली. त्याला जडेजाचीही शानदार साथ मिळाली. जडेजानेही चौकार – षटकारांची बरसात करत ४८ व्या षटकात ४३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी मिळून नाबाद दीडशतकी भागीदारी रचली. त्यामुळे भारताला ३०० धावांचा टप्पा पार करता आला.

जडेजाने ५० चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ६६ धावा केल्या. तर पंड्याने ७६ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारांच्या मदतीने नाबाद ९२ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून ऍश्टन एगरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच ऍडम झम्पा, सीन ऍबॉट आणि जॉस हेझलवूडने प्रत्येकी १ विकेट घेतली.

भारताची मधली फळी कोलमडली

भारतीय संघाने २८ षटकांच्या आत श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या विकेट्स झटपट गमावल्यानंतर विराट कोहलीने हार्दिकला साथीला घेत संघाचा डाव पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

पण अर्धशतक पूर्ण केल्यानंतर ३१ व्या षटकात विराटने ६३ धावांवर असताना विकेट गमावली. त्याला जॉस हेझलवूडने यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरीकरवी झेलबाद केले. सुरुवातीला पंचांनी त्याला नाबाद दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने डीआरएस रिव्ह्यूचा वापर केला. त्यामुळे त्यात विराट बाद असल्याचे दिसले.

विराट बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाने संयमाने डाव पुढे नेला. या दोघांनी ३५ व्या षटकापर्यंत भारताला १६० धावांचा टप्पा पार करुन दिला. तसेच काही आक्रमक फटकेही पंड्याने खेळले. त्यामुळे भारताने मधल्या फळीती विकेट्स गमावल्यानंतर ४० षटकात ५ बाद १९२ धावा केल्या.

विराट कोहलीचे अर्धशतक –

या सामन्यासाठी सलामीवीर म्हणून संधी मिळालेल्या शुभमन गिलने काही चांगले फटके खेळले. मात्र विराटसह दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचल्यानंतर १६ व्या षटकात ऍश्टन एगरने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर तो पायचित बाद झाला. यावेळी त्याने डीआरएस रिव्ह्यू देखील घेतला. मात्र हा रिव्ह्यूमध्ये अंपायर डिसिजन असा निर्णय आल्याने गिलला विकेट गमवावी लागली. त्याने ३९ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह ३३ धावा केल्या.

तो बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी आला. त्याने विराटला चांगली साथ द्यायला सुरुवात केली होती. विराटने २३ व्या षटकात ४० धावांचा आकडा पार केला. पण त्याचवेळी या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ऍडम झम्पाने अय्यरला १९ धावांवर असताना बाद केले.

अय्यर बाद झाल्यानंतर केएल राहुल विराटला साथ देण्यासाठी आला. मात्र तो देखील खास कामगिरी करु शकला नाही. तो २६ व्या षटकात ५ धावांवर पायचित झाला. त्याल एगरने पायचित केले. त्याने डीआरएस रिव्ह्यू घेतला. पण हा रिव्ह्यू त्याच्या विरोधात गेला. त्यामुळे २६ षटकांच्या आतच भारताला ४ विकेट्स गमवाव्या लागल्या.

केएल राहुल बाद झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी आला.

विराटने ६४ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. यावेळी त्याने चार चौकार मारले. हे त्याचे ६० वे वनडे अर्धशतक आहे.

त्यामुळे भारताने २८ षटकात ४ बाद १३३ धावा केल्या आहेत.

विराट-गिलची अर्धशतकी भागीदारी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून शिखर धवन आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात केली होती. मात्र असे असतानाच ६ व्या षटकात वेगवान गोलंदाज सीन ऍबॉटने शिखर धवनला ७ धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला.

शिखर बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी आला. त्याने गिलसह भारताचा डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. या दोघांनीही १५ षटकापर्यंत अर्धशतकी भागीदारी रचली.

याबरोबरच १३ व्या षटकात विराटने २३ वी धाव घेत कारकिर्दीत १२ हजार वनडे धावांचा टप्पा पार केला. तो वनडेमध्ये सर्वात जलद १२ हजार धावा करणारा क्रिकेटपटू ठरला.

भारताने १५ षटकात १ बाद ८१ धावा केल्या आहेत. गिल ३३ धावांवर खेळत आहेत. तर विराट २८ धावांवर खेळत आहे.

भारताने जिंकली नाणेफेक

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून भारताकडून वेगवान गोलंदाज टी नटराजन तर ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीन वनडे पदार्पण करत आहेत.

भारतीय संघाने अंतिम ११ जणांच्या संघात या सामन्यासाठी अनेक बदल केले आहेत. मयंक अगरवाल ऐवजी या सामन्यासा़ठी सलामीला शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे तर युजवेंद्र चहल ऐवजी कुलदीप यादवला फिरकीपटू म्हणून संधी मिळाली आहे. तसेच शार्दुल ठाकूरलाही या सामन्यासाठी संधी मिळाली आहे. तर नवदीप सैनी आणि मोहम्मद शमी अंतिम ११ मधून बाहेर गेले आहेत.

ऑस्ट्रेलियाने ३ बदल त्यांच्या अंतिम ११ जणांच्या संघात केले आहेत. ऑस्ट्रेलियाने ग्रीनला संधी देण्याबरोबरच या सामन्यासाठी सीन ऍबॉट आणि ऍश्टन एगर यांनाही संधी दिली आहे. तसेच या सामन्यात दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नरऐवजी मार्नस लॅब्यूशाने सलामीला फलंदाजी करणार आहे.

भारतीय संघ –

शिखर धवन, शुभमन गिल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल(यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, टी नटराजन

ऑस्ट्रेलिया संघ –

ऍरॉन फिंच (कर्णधार), मार्नस लॅब्यूशाने, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मोझेस हेन्रिक्स, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, ऍश्टन अगर, सीन ऍबॉट, अ‍ॅडम झम्पा, जोश हेजलवुड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---