भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चौथी कसोटी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळली गेली. या सामन्यात भारताचा 184 धावांनी पराभव झाला आहे. अखेरच्या दिवशी भारतासमोर विजयासाठी 340 धावांचं लक्ष्य होतं. मात्र संघ केवळ 155 धावांवर ऑलआऊट झाला.
या पराभवानंतर भारतीय संघ आता मालिकेत 1-2 ने पिछाडीवर गेला आहे. दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जयस्वालनं सर्वाधिक 84 धावांची खेळी खेळली, परंतु थर्ड अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याचा डाव संपुष्टात आला. आता शेवटची कसोटी 3 जानेवारीपासून सिडनीत खेळली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव पाचव्या दिवशी 234 धावांवर आटोपला. भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहनं ५ बळी घेतले. तत्पूर्वी, भारतीय संघानं पहिल्या डावात 369 धावा केल्या होत्या. भारताकडून नितीश कुमार रेड्डीनं 114 धावांचं योगदान दिले. या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ 474 धावांवर गारद झाला होता. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला 105 धावांची आघाडी मिळाली होती.
दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात संथ झाली. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी नव्या चेंडूवर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे भारतानं 16 षटकांत केवळ 25 धावा केल्या. रोहित मोठी खेळी खेळणार असं वाटत असतानाच त्याचा संयम सुटला. तो 9 धावा करून पॅट कमिन्सच्या गोलंदाजीत झेलबाद झाला. चार चेंडूंनंतर कमिन्सनं केएल राहुललाही पहिल्या स्लिपमध्ये झेलबाद केलं. राहुलला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर विराट कोहलीही 5 धावा करून मिचेल स्टार्कच्या चेंडूवर झेलबाद झाला. या डावातही कोहली ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला.
दुसरीकडे, यशस्वी जयस्वाल मात्र क्रीजवर टीकून राहिला. त्यानं 84 धावांपर्यंत मजल मारली. परंतु तिसऱ्या अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याची खेळी संपुष्टात आली. येथून भारताचा डाव गडगडला. यानंतर आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना फलंदाजीत विशेष काही करता आलं नाही. वॉशिंग्टन सुंदर 5 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँड आणि पॅट कमिन्स यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले. भारतीय संघानं शेवटच्या सत्रात सात विकेट गमावल्या, जे पराभवाचं आणखी एक कारण ठरलं.
हेही वाचा –
स्निकोमीटरमध्ये कोणतीही हालचाल नाही, तरीही यशस्वी जयस्वाल आऊट कसा? अंपायरच्या निर्णयामुळे मोठा वाद
भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीत घडला नवा इतिहास, 88 वर्ष जुना रेकॉर्ड उद्ध्वस्त!
मिचेल स्टार्कनं यशस्वी जयस्वालला पुन्हा छेडलं, युवा फलंदाजाचं सडेतोड उत्तर; पाहा व्हायरल VIDEO