टी२० विश्वचषक २०२१ चे जेतेपद ऑस्ट्रेलियाने जिंकले आहे. टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड संघाचा ८ विकेट्स राखून पराभव केला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभी केली होती, पण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियासाठी हे त्यांचे टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील पहिलेच जेतेपद आहे.
टी२० विश्वचषकाचा इतिहास पाहिला तर भारतीय संघाने २००७ मध्ये पहिल्या टी२० विश्वचषकाचे जेतेपद जिंकले होते. याव्यतिरिक्त पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका या संघानीही टी२० विश्वचषकाचे प्रत्येकी एक एक वेळा जेतेपद मिळवले आहे. या यादीत वेस्ट इंडीज हा एकमेव संघ असा आहे, ज्याने दोन वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. आता ऑस्ट्रेलियाने त्यांचा पहिला टी२० विश्वचषक जिंकला आहे आणि या यादीत त्यांचा नव्याने समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलिया आतापर्यंतचा सहावा असा संघ बनला आहे, ज्याने टी-२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवले आहे.
आयसीसी टी२० विश्वचषकाचे आतापर्यंतचे विजेते संघ
२००७ – भारतीय संघ विजयी
२००९ – पाकिस्तान संघ विजयी
२०१० – इंग्लंड संघ विजयी
२०१२ – वेस्ट इडीज संघ विजयी
२०१४ – श्रीलंका संघ विजयी
२०१६ – वेस्ट इंडीज संघ विजयी
२०२१ – ऑस्ट्रेलिया संघ विजयी
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने या सामन्यात सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावांचा डोंगर उभा केला. मात्र प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हा सामना २ विकेट्सच्या नुकसानावर आणि १८.५ षटकात जिंकला.
न्यूझीलंडसाठी या सामन्यात कर्णधार केन विलियम्सनने (८५) महत्वाचे योगादन दिले, पण न्यूझीलंडचा इतर एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाच्या जोस हेजलवुडने १६ धावा दिल्या आणि न्यूझीलंडचे महत्वाचे तीन विकेट्स घेतले.
ऑस्ट्रेलियासाठी फलंदाजी विभागात मिशेल मार्शने ५० चेंडूत सर्वाधिक ७७ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला सहज विजय मिळवून दिला. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वार्ननेही (५३) अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने या सामन्यात १८ धावा दिल्या आणि दोन विकेट्स स्वतःच्या नावावर केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
केन विलियम्सनचा मोठा विक्रम! टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये ८५ धावा करत विश्वविक्रमाची केली बरोबरी
‘देशाला अभिमान वाटावा यासाठी परिश्रम करत राहील’, अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर शिखर धवन झाला व्यक्त
बऱ्याच काळापासून कसोटी संघातून बाहेर असलेल्या ‘या’ ४ खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्ध द्रविड देऊ शकतो संधी