गुरुवारी (7 सप्टेंबर) दक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्स राखून हा सामना जिंकला. कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून फलंदाजीला आलेल्या मार्नस लॅब्युशेन याने शानदार नाबाद खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली. त्यांनी पाकिस्तानला हटवून अव्वलस्थान काबिज केले. पाकिस्तान संघ केवळ 10 दिवस प्रथम क्रमांकावर राहिला.
यजमान दक्षिण आफ्रिका संघाला या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. ऑस्ट्रेलियाने घेतलेला प्रथम गोलंदाजीचा निर्णय योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करतना यजमान संघ 222 धावांवर सर्वबाद झाला. कर्णधार टेंबा बवुमा याचे नाबाद शतक (114) यासाठी महत्वपूर्ण ठरले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 40.2 षटकांमध्ये 223 धावांचे लक्ष्य गाठले आणि मालिकेत 0-1 अशी आघाडीही घेतली. संघ अडचणीत असताना कॅमेरून ग्रीन याच्या जागी कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून आलेल्या मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) याने 93 चेंडूत 80 धावांची नाबाद खेळी केली.
या विजयामुळे ऑस्ट्रेलियन संघाने वनडे क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला. दहा दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या नव्या वनडे क्रमवारीत पाकिस्तान संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. मात्र, आता ऑस्ट्रेलियाने पुन्हा ती जागा घेतली आहे. पुढील काही दिवस आता या दोन्ही संघातील हा अव्वलस्थानाचा संघर्ष चांगलाच रंगणार आहे.
सध्या पाकिस्तान आशिया चषक स्पर्धा खेळत आहे. 10 सप्टेंबर रोजी भारताविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला तर ते पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचतील. तर, ऑस्ट्रेलियाकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही वनडे मालिका जिंकून आपले स्थान अबाधित राखण्याची संधी असणार आहे.
(Australia Clinch Number One Spot In ICC ODI Rankings From Pakistan)
महत्वाच्या बातम्या –
जुन्या फॉर्मात परतला भुवनेश्वर कुमार! यूपी टी-20 लीगमध्ये घेतल्या एकापेक्षा एक विकेट्स
धोनी-विराट नाहीत भारताचे सर्वोत्तम कर्णधार! गौतम गंभीर आपल्या ‘या’ वक्तव्याने पुन्हा चर्चेत