पर्थ । ॲशेस मालिकेत तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने सामन्यावरची पकड मजबूत केली आहे. आज ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टिव्ह स्मिथने द्विशतक झळकावले आहे. तसेच मिचेल मार्श देखील द्विशतकाच्या जवळ येऊन पोहोचला आहे.तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद ५४९ धावा केल्या आहेत.
आजच्या दिवसाची सुरुवात शॉन मार्श आणि स्टिव्ह स्मिथने चांगली केली. त्यांनी ३ बाद २०३ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. परंतु शॉन २८ धावांवर मोईन अलीच्या गोलंदाजीवर जो रूट करवी झेलबाद झाला. इंग्लंडला आजच्या संपूर्ण दिवसात हा एकच बळी मिळवण्यात यश मिळाले.
नंतर स्मिथ आणि शॉनचाच भाऊ मिचेल मार्शने एकही बळी पडू न देता नाबाद ३०१ धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी इंग्लंड विरुद्ध ५ व्या विकेटसाठी केलेली तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी आहे.
याबरोबरच स्मिथनेही आज द्विशतक करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने ३९० चेंडूत नाबाद २२९ धावा केल्या आहेत. त्याच्या या खेळीत त्याने २८ चौकार आणि १ षटकार मारला आहे. तसेच स्मिथचे हे दुसरे कसोटी द्विशतक आहे.याबरोबरच ॲशेस मालिकेत द्विशतक करणारा तो पाचवा कर्णधार ठरला आहे. स्मिथने यावर्षी एकवर्षात कसोटीत १००० धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला आहे.
स्मिथबरोबरच आज दीडशतकी खेळी करणाऱ्या मिचेलने २३४ चेंडूत नाबाद १८१ धावा केल्या आहेत. यात त्याने २९ चौकार मारले आहेत. हे मिचेलचे पहिलेच कसोटी शतक आहे आणि हे त्याने त्याच्या घराच्या मैदानावर केले असल्याने त्याच्यासाठी ते खास असेल.
स्मिथ आणि मिचेल यांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १४६ धावांची आघाडी घेतली आहे.
संक्षिप्त धावफलक:
इंग्लंड पहिला डाव: सर्वबाद ४०३ धावा
ऑस्ट्रेलिया पहिला डाव: ४ बाद ५४९ धावा
स्टिव्ह स्मिथ(२२९*) आणि मिचेल मार्श(१८१*) खेळात आहेत.
Runs galore! Steve Smith and Mitchell Marsh bat superbly to help Australia to 549/4 at Stumps on Day 3, a lead of 146.https://t.co/3bkqXxXy1d #AUSvENG #Ashes pic.twitter.com/TT9nn9VxHU
— ICC (@ICC) December 16, 2017