मेलबर्न। आज(८ मार्च) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर गतविजेत्या ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. या विश्वचषकाचा पहिला सामनाही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातच झाला होता.
टी२० विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा –
साखळी फेरी – अ गट –
पहिला सामना – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत
ऑस्ट्रेलिया संघाची या विश्वचषकातील सुरूवात धक्कादायक पराभावाने झाली. भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात त्यांना पराभवाचा जोरदार धक्का दिला. दिप्ती शर्माच्या 49 धावांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १३३ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ ११५ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात भारताची फिरकीपटू पूनम यादव चमकली. तिने या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या. तर ३ विकेट्स घेत शिखा पांडेने तिला चांगली साथ दिली.
दुसरा सामना – ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका
या सामन्यात चमारी अथापट्टूच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेने 122 धावा केल्या. याला प्रत्त्युत्तर देताना रेचल हेनेसच्या शानदार 60 धावांमुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना सहज जिंकला. तिला कर्णधार मेग लॅनिंगची 41 धावांची साथ लाभली.
तिसरा सामना – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने एलिसा हिली(83) आणि बेथ मूनी(81)च्या दीडशतकी भागिदारीमुळे 189 धावा केल्या. एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव केवळ 103 धावांमध्ये संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शटने 3 विकेट घेतल्या.
चौथा सामना – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड
या सामन्यातही प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने बेथ मूनीच्या(60) अर्धशतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 155 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने केटी मार्टीन(37) व सोफी डीव्हाईन(31)च्या खेळींमुळे विजय समीप आणला होता पण त्यांना केवळ 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शटने आणि जॉर्जिया वेअरहॅमने 3 विकेट घेतल्या. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्य सामना – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका संघाने टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. कर्णधार मेग लॅनिंगने 49 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने 134 धावा केल्या. पहिल्या डावा नंतर पाऊस झाल्याने डकवर्थ लुईस मेथडप्रमाणे दक्षिण आफ्रिकेला 13 षटकांमध्ये 98 धावांचे लक्ष होते. परंतु 13 षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेला केवळ 92 धावाच करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोचला