अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 6 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5.30 वाजता सुरु होईल.
भारतीय संघाचा हा या वर्षातील दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडनंतरचा मोठा परदेश दौरा आहे. भारताला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या दौऱ्यात कसोटी मालिकेत विजय मिळवण्यात अपयश आले होते. त्यामुळे विराट कोहली कर्णधार असलेला भारतीय संघ आॅस्ट्रेलियामध्ये कसोटी विजय मिळवण्याच्या इराद्यानेच उतरणार आहे.
त्याचबरोबर आॅस्ट्रेलिया संघात स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंची त्यांच्यावर बंदी असल्याने अनुपस्थिती असेल. त्यामुळे आॅस्ट्रेलियाला या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे.
या सामन्यासाठी आॅस्ट्रेलियन संघाने अंतिम 11 जणांचा तर भारताने अंतिम 12 जणांचा संघ घोषित केला आहे.
भारताच्या 12 जणांच्या संघात मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांना तर आर अश्विन या फिरकी गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. हे चार गोलंदाज भारतीय संघात असतील. तसेच अंतिम 11 चा संघ निवडताना भारताला रोहित शर्मा आणि हनुमा विहारी या दोघांपैकी एकाला वगळण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. पण जर विहारीची निवड झाली तर भारताला गोलंदाज म्हणून आणखी एक पर्याय मिळेल. पण कोहली संघ व्यवस्थापक याबद्दल काय निर्णय घेणार हे पहावे लागेल.
त्याचबरोबर फलंदाजीमध्ये केएल राहुल आणि मुरली विजय यांच्यावर सलामीची जबाबदारी असेल. तसेच भारताकडे चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली अशी भक्कम मधली फळी आहे. यष्टीरक्षणाची जबाबदारी आणि तळातील फलंदाजीची जबाबदारी ही रिषभ पंतकडे असणार आहे.
असे असले तरी भारतीय फलंदाजांना आॅस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स या वेगवान त्रिकूटाचा सामना करावा लागणार आहे. तसेच नॅथन लिआॅन या फिरकी गोलंदाजाचाही भारताविरुद्ध खास करुन विराट कोहली विरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे.
आॅस्ट्रेलियाकडून मार्क्यूस हॅरिस या सामन्यातून पदार्पण करणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल. त्याचबरोबर आॅस्ट्रेलियाने त्यांचा उपकर्णधार मिशेल मार्शला या सामन्यातून वगळले आहे. त्याच्या ऐवजी पिटर हँड्सकॉम्बला संधी देण्यात आली आहे.
त्यामुळे मागीलवर्षी झालेल्या अॅडलेड कसोटीपासून पहिल्यांदाच आॅस्ट्रेलियाचा संघ अष्टपैलू खेळाडूशिवाय मैदानात उतरणार आहे. कारण त्यांच्या संघात 7 फलंदाज आणि मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन लिआॅन हे चार गोलंदाज असतील.
तसेच आॅस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झालेल्या मालिकांचा इतिहास पाहता अनेकदा या दोन संघात शाब्दिक चकमकी झाल्या आहेत. पण यावेळी या सगळ्यात न पडण्याचा निर्णय विराट कोहलीने घेतला आहे. त्याने म्हटले आहे की या सर्व गोष्टींकडे त्याला लक्ष द्यायचे नाही. तर फक्त जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करायचे आहे.
वातावरण-
येथील वातावरण उष्ण असेल, तसेच 36°C पर्यंत तापमान असेल. तसेच तेथील क्यूरेटरने सांगितले होते की खेळपट्टीवर गवत असणार आहे. त्यामुळे त्याचा दोन्ही संघातील वेगवान गोलंदाजांना चांगला उपयोग होऊ शकतो.
आमने – सामने
आत्तापर्यंत आॅस्ट्रेलिया आणि भारतात 94 कसोटी सामने झाले असून भारताने 26 सामन्यात विजय तर 41 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच 1 सामना बरोबरी सुटला आहे आणि 26 सामने अनिर्णित राहिले आहेत.
तसेच या दोन संघात आॅस्ट्रेलियन भूमीत आत्तापर्यंत 44 कसोटी सामने झाले आहेत. यातील फक्त 5 सामन्यात विजय मिळवण्यात भारताला यश आले आहे. तसेच आॅस्ट्रेलियाने 28 सामने जिंकले असून 11 सामने अनिर्णित राहिले आहेत.
अॅडलेड कसोटीबद्दल सर्वकाही…
आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत कधी होणार आहे पहिला कसोटी सामना?
आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना 6 डिसेंबर 2018 पासून सुरु होणार आहे.
कोठे होईल आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना?
आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत पिहला कसोटी सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे.
किती वाजता सुरु होईल आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना?
भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5.30 वाजता आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.
आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?
सोनी टेन 3,सोनी टेन 3 एचडी, सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना पाहता येणार आहे.
आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?
sonyliv.com या वेबसाईटवर आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना ऑनलाइन पाहता येईल.
असा आहे 12 जणांचा भारतीय संघ–
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, एम विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, एम शमी , इशांत शर्मा, जसप्रीत बुमरा
असा आहे 11 जणांचा आॅस्ट्रेलिया संघ-
अॅरॉन फिंच, मार्क्यूस हॅरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पिटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, टीम पेन(कर्णधार, यष्टीरक्षक) पॅट कमिंन्स, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, नॅथन लिआॅन.
महत्त्वाच्या बातम्या:
–असा आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेचा इतिहास
–अंदाज दिग्गजांचे: कोण जिंकणार भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका?
–आॅस्ट्रेलियाच्या या वेगवान त्रिकूटापेक्षाही इशांत शर्माने अॅडलेडवर खेळले आहेत सर्वाधिक कसोटी सामने