कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (२ डिसेंबर) होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.१० वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना कॅनबेराच्या मनुका ओव्हल मैदानावर होईल.
प्रतिष्ठा राखण्यासाठी भारतीय संघाला मैदानात उतरावे लागेल
हा सामना भारतीय संघासाठी प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण या वनडे मालिकेतील पहिले २ सामने ऑस्ट्रेलियाने आधीच जिंकून २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे कमीत कमी तिसरा सामना जिंकून व्हाईटवॉश टाळण्याचे आव्हान भारतीय संघाला असेल. तर ऑस्ट्रेलिया संघ मात्र या सामन्यात भारतीय संघावर निर्विवाद वर्चस्व राखण्याच्या ध्येयानेच उतरेल.
तसेच पहिले दोन्ही सामना सिडनीमध्ये झाले होते. तर आता तिसरा सामना कॅनबेरा येथे होईल.
भारतीय गोलंदाजांना अपयश –
पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या विकेट्स झटपट घेण्यात अपयश आले आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात तर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या ५ फलंदाजांनी प्रत्येकी ५० धावांचा टप्पा पार केला होता. त्यामुळे तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ व्यवस्थापन गोलंदाजांच्या फळीत बदल करु शकतात.
पहिल्या दोन्ही सामन्यात नवदीप सैनी महागडा गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी टी नटराजनला संधी दिली जाऊ शकते. तसेच फिरकीपटू म्हणून युझवेंद्र चहल ऐवजी कुलदीप यादवचा संघात समावेश होऊ शकतो.
स्टिव्ह स्मिथला थांबवण्याचे आव्हान –
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ या मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने पहिल्या दोन्ही सामन्यात शतके केली आहेत. विशेष म्हणजे ही दोन्ही शतके त्याने आक्रमक अंदाजात ६२ चेंडूत पूर्ण केली आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर स्मिथला रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
एवढेच नाही तर भारताला ग्लेन मॅक्सवेल, ऍरॉन फिंच या खेळाडूंनाही रोखावे लागणार आहे. फिंचने या मालिकेत १५० पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत. तसेच मॅक्सवेलने पहिल्या दोन्ही सामन्यात आक्रमक खेळ केला आहे.
वॉर्नर, कमिन्सची कमी जाणवेल –
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने तिसऱ्या वनडे सामन्याला मुकणार आहे. एवढेच नाही तर तो आगामी टी२० मालिकेलाही मुकणार आहे. वॉर्नरने पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात फिंचबरोबर ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात दिली होती. मात्र आता त्याच्याऐवजी तिसऱ्या वनडेत फिंचसह सलामीला कोण उतरणार हा प्रश्न आहे.
याबरोबरच ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला तिसऱ्या वनडेसाठी आणि टी२० मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. त्यामुळे तो देखील तिसऱ्या वनडेसाठी ऑस्ट्रेलिया संघात असणार नाही. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या अन्य गोलंदाजांना भारतीय फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी उचलावी लागेल; विशेषत: अनुभवी मिशेल स्टार्कला.
भारतीय फलंदाज फॉर्ममध्ये –
भारतीय गोलंदाजांची कामगिरी खास होत नसली तरी भारतीय फलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले आहे. त्यांनी दोन्ही वनडेत ३०० धावांचा आकडा पार केला आहे. हार्दिक पंड्या दोन्ही सामन्यात चांगल्या लयीत दिसला. तसेच कर्णधार विराट कोहलीनेही दुसऱ्या वनडेत अर्धशतकी खेळी करत तो फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले. शिखर धवननेही पहिल्या वनडेत चांगली कामगिरी केली होती. मात्र केएल राहुलला त्याच्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. तसेच श्रेयस अय्यरलाही चांगली कामगिरी करुन दाखवावी लागेल.
टी२० मालिकेसाठी आत्मविश्वास मिळवावा लागेल
या वनडे मालिकेनंतर ३ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाला तिसरा वनडे सामना जिंकून आत्मविश्वास मिळवावा लागेल.
दोन्ही संघ –
भारत – मयंक अगरवाल, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मनीष पांडे, संजू सॅमसन, टी नटराजन, शुभमन गिल
ऑस्ट्रेलिया – ऍरॉन फिंच (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍश्टन अगर, ऍलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवुड, मोसेस हेन्रीक्स, मार्नस लॅब्यूशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, डॉर्सी शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, अँड्र्यू टाय, अॅडम झांपा.
महत्त्वाच्या बातम्या –
इशारा देऊनही पाकिस्तानचे आणखी ३ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; न्यूझीलंड सरकार उचलणार कठोर पाऊल?
रोहितच्या निवडीवरून झालेल्या वादात भारतीय दिग्गजाची उडी, विराटचे केले समर्थन
नेटमध्ये सराव करताना टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त; धाडलं भारतात