भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानात खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजांनी खराब प्रदर्शन केले होते. त्यामुळे भारतीय संघाचा पहिला डाव सर्वबाद 244 धावसंख्येवर आटोपला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी एक भविष्यवाणी वर्तवली आहे, ज्यामधे ते म्हणाले आहेत की भारतीय संघ दुसर्या डावात 200 धावा सुद्धा करू शकणार नाही.
ऑस्ट्रेलिया संघाने आपला दुसरा डाव 87 षटकांत 6 बाद 312 धावसंख्येवर घोषित केला आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्या डावातील 94 धावांच्या आघाडीसह भारतीय संघाला विजयासाठी 407 धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामान्यादरम्यान ‘7 क्रिकेट’ चॅनेलसोबत बोलताना रिकी पाँटिंग यांनी एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की त्याला नाही वाटत भारतीय संघ 200 धावांचा आकडा सुद्धा पार करू शकेल.
माजी दिग्गज रिकी पाँटिंग म्हणाले, “310 अजून पुढे आहे, मात्र प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर मला वाटत नाही की भारत दुसर्या डावात 200 धावाही करू शकेल.”
या चर्चेदरम्यान रिकी पाँटिंगने सांगितले की त्याला भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्या विरुद्ध खेळताना नेहमी अडचण येत होती.
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व –
ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या दिवशी दुसर्या सत्राच्या समाप्ती बरोबर आपल्या दुसरा डाव 6 बाद 312 धावसंख्येवर घोषित केला. त्यांना पहिल्या डावात 94 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे आता दुसरा डाव घोषित केल्याने त्यांना 406 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून कॅमरॉन ग्रीनने सर्वाधिक 84 धावा केल्या. तसेच स्टीव्ह स्मिथने 81 धावांची आणि मार्नस लॅब्यूशानेने 73 धावांची खेळी साकारली. पेनने 52 चेंडूचा सामना करताना 6 चौकार ठोकत नाबाद 39 धावा केल्या. भारताकडून आर अश्विन आणि नवदीप सैनी या दोघांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 34 षटकात 2 बाद 98 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 98 चेंडूचा सामना करताना 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर शुबमन गिलने 64 चेंडूत 4 चौकारांच्या साह्याने 31 धावांची खेळी केली. तसेच चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे 9 आणि 4 धावांवर नाबाद खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. भारताला विजयासाठी शेवटच्या दिवशी 309 धावांची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या हंगामातून माघार घेणारा डेल स्टेन खेळणार पाकिस्तान सुपर लीगमध्ये
रोहित-गिल जोडीची लाजबाव कामगिरी! मागील ५२ वर्षात कुणालाही न जमलेला विक्रम केला नावावर
वाईट वाटतंय, पण नारळ द्यावाच लागेल! आयपीएल लिलावाअगोदर चेन्नई ‘या’ खेळाडूंना करू शकते ‘बाय बाय’






