पर्थ। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे आज(१८ डिसेंबर) दुसरा कसोटी सामना पार पडला आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने १४६ धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ही कसोटी जिंकण्यासाठी २८७ धावांचे आव्हान ठेवले होते. परंतू या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसाखेर ११२ धावांतच ५ विकेट्स गमावल्या होत्या.
त्यामुळे भारताने आज पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात ५ बाद ११२ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. परंतू चौथ्या दिवशी नाबाद असणारा हनुमा विहारी लवकर बाद झाला. त्याला मिशेल स्टार्कने बाद केले. विहारीने २८ धावा केल्या.
त्यानंतर रिषभ पंत आणि उमेश यादवने भारताचा डाव सांभाळला होता. परंतू काही वेळातच रिषभ पंतनेही ३० धावांवर असताना विकेट गमावली.
त्यानंतर लगेचच उमेश यादवला स्टार्कने तर पॅट कमिन्सने इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला बाद करत भारताचा डाव १४० धावांवर संपुष्टात आणला.
तत्पुर्वी भारताने चौथ्याच दिवशी केएल राहुल(०), मुरली विजय(२०), चेतेश्वर पुजारा(४), विराट कोहली(१७) आणि अजिंक्य रहाणे(३०) यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाकडून या डावात मिशेल स्टार्क(३/४६), जोश हेजलवूड(२/२४), पॅट कमिन्स(२/२५) आणि नॅथन लायन(३/३९) यांनी विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पुढील सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे होणार आहे.
संक्षिप्त धावफलक:
ऑस्ट्रेलिया पहिला डाव- सर्वबाद ३२६ धावा
भारत पहिला डाव – सर्वबाद २८३ धावा
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – सर्वबाद २४३ धावा
भारत दुसरा डाव – सर्वबाद १४० धावा
महत्त्वाच्या बातम्या:
–केएल राहुलला भारतात लवकर परतण्यासाठी चाहत्याने सुचवले हे विमान
–जाणून घ्या २०१९च्या आयपीएलसाठी कोणते संघ किती परदेशी खेळाडू खरेदी करु शकतात
–उद्या होणाऱ्या आयपीएल 2019 लिलावाबद्दल सर्वकाही…
–पृथ्वी शॉच्या ऐवजी टीम इंडियात निवड झालेला कोण आहे मयंक अगरवाल?