आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या पात्रता फेरी सामन्यांचा टप्पा पार पडला असून ४ संघांनी सुपर १२ फेरीत प्रवेश केला आहे. यासह सुपर १२ फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून शनिवारपासून (२३ ऑक्टोबर) या टप्प्याची सुरुवात होणार आहे. यातील पहिली लढत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात अबु धाबी येथे रंगणार आहे. हा पहिलावहिला सामना जिंकत विजयासह आपल्या टी२० विश्वचषक अभियानाची सुरुवात करण्याकडे उभय संघांचे लक्ष असेल.
या दोन्हीही संघांनी आतापर्यंत टी२० विश्वचषकात एकदाही जेतेपद पटकावलेले नाही. परंतु या सामन्यात दक्षिण आफ्रिकापेक्षा ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात जास्त चिंतेचे वातावरण दिसते आहे. कारण टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला बांगलादेश, वेस्ट इंडिज, न्यूजीलंड, भारत आणि इंग्लंड संघांकडून द्विपक्षीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकांदरम्यान ऑस्ट्रेलियाने फक्त ५ सामने जिंकले आहेत आणि १३ सामना गमावले आहेत.
तसेच उभय संघातील आमने सामने कामगिरी पाहता दक्षिण आफ्रिकेचे पारडे ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त जड दिसते आहे. दक्षिण आफ्रिकेने मागील १० टी२० सामन्यांपैकी ९ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. याबरोबरच नुकत्याच पार पडलेल्या अफगानिस्तान आणि पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यातही त्यांचे प्रदर्शन शानदार राहिले आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने मागील १० टी२० सामन्यांपैकी ८ सामने गमावले आहेत. याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा संघ विजयासाठी संघर्ष करताना दिसला होता. त्यानंतर दुसऱ्या सराव सामन्यात भारताने त्यांना पराभवाची धूळ चारली होती.
सलामीवीर वॉर्नरचा खराब फॉर्म, पण मॅक्सवेलकडून संघाला अपेक्षा
याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया संघातील काही खेळाडूही सध्या खराब फॉर्मशी झगडत आहेत. त्यांचा सलामीवीर डेविड वॉर्नर हा सध्या अत्यंत वाईट लयीत आहे. सराव सामन्यातही त्याचा खराब फलंदाजी फॉर्म पाहायला मिळाला आहे. तर गुडघ्याच्या सर्जरीनंतर मैदानावर उतरलेल्या कर्णधार ऍरॉन फिंचकडे सरावाची कमतरता आहे. तसेच उपकर्णधार पॅट कमिन्सही आयपीएलच्या युएई टप्प्यातील सामन्यांमध्ये अनुपलब्ध होता.
परंतु ऑस्ट्रेलियाचे मधल्या फळीतील फलदाज शानदार लयीत आहेत. स्टिव्ह स्मिथ, अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल आणि मिशेल मार्श सामन्याचे चित्र पालटू शकतात. त्यातही मॅक्सवेलची बॅट युएईच्या मैदानांवर खूप चालली आहे. त्यामुळे या खेळाडूंवर संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
ऑस्ट्रेलियाची संभावित प्लेइंग इलेव्हन: एरॉन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, एस्टन एगर, मिचेल स्टार्क, एडम झम्पा, जोश हेजलवुड
दक्षिण आफ्रिकाची संभावित प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डि कॉक, टेंबा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, रासी वॅन डर डुसेन, डेविड मिलर, हेन्रिक्स क्लासेन, वियान मुल्डर, कागिसो रबाडा, केशव महाराज, एन्रिच नॉर्किए, तबरेज शम्सी
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकातील टीम इंडियाचे वेळापत्रक झाले निश्चित; पाहा कुठे, कधी अन् कोणाविरुद्ध होणार सामने
टी२० विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय संघासाठी पाकिस्तानचे हे ‘पंचक’ ठरु शकते डोकेदुखी






