---Advertisement---

T20 WC26: ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर जाणार नाही? श्रीलंकाच ठरणार तारणहार, जाणून घ्या कसे ते

On: मंगळवार, फेब्रुवारी 17, 2026 11:15 AM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत श्रीलंकेसह पाच संघ सुपर-८मध्ये पोहोचले आहेत. सोमवारी (१६ फेब्रुवारी) श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सने पराभव केला, यामुळे ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील स्थान धोक्यात आले आहे. ते सुपर-८मध्ये पोहोणार की नाही याच्या चर्चा सुरू झाल्या. ते स्पर्धेच्या पुढच्या फेरीत जातील, यामागे दोन कारणे आहेत. आयर्लंडचा झिम्बाब्वेविरुद्ध १०० टक्के जिंकण्याचा विक्रम आणि श्रीलंकेचा आयसीसी स्पर्धांमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध एकही सामना न गमावण्याची कामगिरी.

झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत १८ टी२० सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी ८-८ सामने जिंकले असून २ सामने अनिर्णीत राहिले. यामुळे दोन्ही संघांची विजयाची टक्केवारी ५०-५० अशी आली, तर १०० टक्के कसे काय हा प्रश्न पडला असेल. यामध्ये केवळ या दोन्ही संघांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांची आकडेवारी महत्वाची नसून ऑस्ट्रेलिसाठी ते कसे फायद्याचे ठरते ते जाणून घेऊ.

ऑस्ट्रेलिया अजुनही या स्पर्धेच्या सुपर-८मध्ये पोहोचू शकते, त्यामागचे मोठे कारण आशियाई खेळपट्ट्या आहेत. या खेळपट्ट्यांवर आयर्लंडची झिम्बाब्वेविरुद्ध जिंकण्याची टक्केवारी १०० आहे. या दोन्ही संघात आधी आशियाई खेळपट्टीवर सामना झाला आहे. २०१४मध्ये सिलहेटमध्ये झालेला तो सामना आयर्लंडने ३ विकेट्सने जिंकला होता. आता आयर्लंडने त्यांची ही कामगिरी अशीच ठेवली, तर ऑस्ट्रेलियाला सुपर-८मध्ये जाण्याची संधी आहे.

ऑस्ट्रेलिया सुपर-८मध्ये जाऊ शकते, यामागचे दुसरे कारण श्रीलंका आहे. ज्यांनी त्यांच्यावर स्पर्धेबाहेर जाण्याची वेळ आणली, आता तेच त्यांना स्पर्धेत आणू शकतील. आयसीसी स्पर्धांच्या इतिहासात श्रीलंका झिम्बाब्वेकडून कधीच हारला नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ९ सामने खेळले गेले आणि प्रत्येक सामने श्रीलंकेनेच जिंकले आहेत. यातील दोन सामने टी२० विश्वचषकाचेही आहेत.

झिम्बाब्वेचे या स्पर्धेत दोन सामने बाकी आहेत. आयर्लंडविरुद्धचा सामना आज (१७ फेब्रुवारी) आणि श्रीलंकेविरुद्धचा सामना १९ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. हे दोन्ही सामने झिम्बाब्वेने गमावले तर ऑस्ट्रेलिया सुपर-८मध्ये जाणार. तसेच ऑस्ट्रेलियाला ओमान विरुद्धचा सामनाही जिंकावा लागेल. जो २० फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---